समन्स बजावण्यासाठी इंदुरीकर महाराज भेटेनातच ! | पुढारी

समन्स बजावण्यासाठी इंदुरीकर महाराज भेटेनातच !

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  येथील प्रथम वर्ग न्यायालयाने तारखेला उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यासाठी कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज भेटत नसल्याचा अहवाल संगमनेर तालुका पोलिसांनी न्यायालयात सादर केला. दरम्यान, यामुळे आज (शुक्रवार) चे कामकाज होऊ शकले नाही. आता पोलिस उपाधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यामार्फत समन्स पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी 8 नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी पुत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल आहे. खटला रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर हे प्रकरण संगमनेर कनिष्ठ न्यायालयात पुन्हा सुरू झाले. त्याची आज सुनावणी होती.

संबंधित बातम्या :

अपत्यप्राप्ती संदर्भात कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी कायदा मोडणारे वक्तव्य केल्याचे फेब्रुवारी 2020 मध्ये उघकीस आले. पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधी जिल्हास्तरीय समितीमध्ये सर्वप्रथम यावर चर्चा झाली. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यात सहभाग घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजीविरोधी संघर्ष विभागाच्या प्रमुख अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली. यानंतर जुलै 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला. ते प्रकरण संगमनेर येथे कनिष्ठ न्यायालयात सुरू आहे. याविरोधात इंदोरीकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथे हा आदेश रद्द करण्यात आला. त्यावर अंनिसने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून इंदोरीकर महाराजांविरुद्ध खालच्या कोर्टात केस चालवण्याचा आदेश दिला.

या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यामुळे संगनेरच्या कनिष्ठ न्यायालयात पुन्हा खटला सुरू झाला. त्याची तारीख आज शुक्रवारी (13 ऑक्टोबर) होती. यासाठी न्यायालयाने संगमनेर तालुका पोलिसांमार्फत इंदोरीकर यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासंबंधी समन्स पाठविले होते.

Back to top button