निधी दिला नाही, कामे होईनात; शिवसेना नगरसेविकेचा राजीनामा | पुढारी

निधी दिला नाही, कामे होईनात; शिवसेना नगरसेविकेचा राजीनामा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापौर व शिवसेनेचे पदाधिकारी दुय्यम वागणूक देत आहेत. नागापूर-बोल्हेगाव रस्त्यासाठी वारंवार आंदोलने करूनही निधी दिला जात नाही. अन्य प्रभागांत 24 कोटींची कामे आणि प्रभाग 7 मध्ये कोणताही निधी नाही, असा आरोप करीत नगरसेविका कमल सप्रे यांनी अखेर शिवसेना (उबाठा) पक्षाचा राजीनामा संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांच्याकडे सोपविला.
शिवसेनेच्या माध्यमातून नागापूर-बोल्हेगाव प्रभाग सातमधून निवडून आले. परंतु, महापालिका प्रशासन, महापौर व शिवसेना पदाधिकार्‍यांकडून दुय्यम वागणूक मिळत आहे.

संबंधित बातम्या :

गेल्या अडीच वर्षांपासून स्थानिक कामांचे एस्टिमेट महापालिका कार्यालयात असून ते खतविण्यात आलेले नाही. आजमितीला प्रभागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी मंदिर रस्ता खोदून ठेवल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. अनेकांचे अपघात झाले तरी अद्याप कोणीही दखल घेतलेली नाही. महापालिका प्रशासन व पदाधिकारी जनतेला नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरले आहेत. महापौर शिवसेनेचा व नगरसेवकही शिवसेनेचा असल्याने नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे, अशी खंत सप्रे यांनी व्यक्त केली आहे.

मागील काळात वेळोवेळी आंदोलनादरम्यान आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले. या प्रभागातील लाईट, पाणी व ड्रेनेजच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून या भागातून मोठ्या प्रमाणात करवसुलीही होते. निधीसाठी मात्र वारंवार पाठपुरावा करूनही आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे नागापूर-बोल्हेगावकरांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून नैतिकतेने नगरसेविका कमल दत्तात्रय सप्रे व माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे पाटील पक्षाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

महापौर व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आमच्यावर अन्याय केला. अडीच वर्षांत एकही काम प्रभागात दिले नाही. जनतेची कामे होत नसतील तर, पक्षात कशाला राहायचे? जो पक्ष जनतेची कामे करील, त्याच्या पाठीशी नागापूर-बोल्हेगावची जनता राहील.
                                                             – दत्ता पाटील सप्रे, माजी नगरसेवक

आम्ही पाच वर्षे प्रामाणिकपणे शिवसेनेबरोबर राहिलो. कधीही पदाची अपेक्षा केली नाही. तरी सुद्धा आमच्या प्रभागात विकासकामांसाठी निधी मिळत नसेल तर पक्षात राहून काय उपयोग? त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून राजीनाम देणेच योग्य वाटते.
                                                                                – कमल सप्रे, नगरसेविका

प्रभाग सातमधील रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू केले आहे. प्रभाग सातमध्ये मोठ्या प्रमाणात निधीही दिला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची दुय्यम वागणूक दिलेली नाही. गैरसमजुतीतूनच कमल सप्रे यांनी राजीनामा दिला असावा.
                                                                      – रोहिणी शेंडगे, महापौर

Back to top button