

नगर : पुढारी वृत्तसेवा : सहायक संचालक नगररचनाकार राम चारठाणकर सतत रजेवर जात असल्याने नागरिकांची कामे खोळंबत होती. त्यामुळे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी त्यांची कार्यालयीन जबाबदारी कमी करून, त्यांच्याकडील कामकाज नगररचनाकार सर्वेश चाफळे यांच्याकडे सोपविले आहे. चारठाणकर अनेक वेळा कार्यालयात नसल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. अनेक वेळा नागरिक दिवसभर बसून माघारी जात होते. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
स्थायी समिती व सर्वसाधारण सभेलाही चारठाणकर गैरहजर राहिल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या. दरम्यान, चारठाणकर रजेवर गेल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 69 अन्वये आयुक्तांनी सहायक संचालक नगररचनाकार व नगररचनाकार यांना अधिकारांचे वाटप केले. त्यात सहायक संचालक नगररचनाकार राम चारठाणकर यांच्याकडील अनेक कामांची जबाबदारी काढून नगररचनाकार चाफळे यांच्याकडे सोपविण्यात आली.
नगररचनाकारांची कामे
300.00 चौरस मीटरपर्यंत भूखंडाचे क्षेत्र, भूखंडावरील बांधकाम असलेल्या परवाने देणे, बांधकाम प्रिमियम आकारून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशाक (एफएसआय) विकास हक्क बांधकामास वापरण्याची परवानगी देणे, बांधकामास भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मंजुरी देणे अशी सर्व कामे, मंजूर रेखांकनातील भूखंडाची उपविभागणी करणे, भूखंडाचे एकत्रीकरण करणे किंवा मंजूर रेखांकनातील काही भागांची सुधारित मांडणी करण्याचे सर्व परवाने, खरेदी-विक्रीसंबंधी ना हरकत दाखले, व्यवसायासाठी ना हरकत दाखले देणे, तसेच गुंठेवारी मंजूर करणे (200 चौ.मी. क्षेत्रापर्यंत); भाग नकाशे, खरेदी विक्रीसाठी ना हरकत देणे तसेच 300.00 चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्राच्या भूखंडावरील सर्व विकास परवाने, सर्व रेखांकनास मंजुरी प्रकरणे, आरक्षण खालील किंवा इतर जमिनीच्या भूसंपादनाच्या बदल्यात विकास हक्क देणे (टीडीआर), समावेशक आरक्षण धोरणाच्या माध्यमातून आरक्षणे विकसित करणे, इ.बाबत प्रकरणे निर्णयासाठी, मंजुरीसाठी, आयुक्तांकडे सादर करणे, अशी सर्व कामांची जबाबदारी नगररचनाकार चाफळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सहायक संचालक नगररचनाकारांची कामे
सर्व शासकीय पत्रव्यवहार, न्यायालयीन प्रकरणांची पूर्तता, विविध बैठका, सभांना उपस्थिती व त्यामध्ये दिलेल्या सूचना आदेशाची पूर्तता करणे या कामांची जबाबदारी सहायक संचालक नगररचनाकार राम चारठाणकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महापालिकेत येणार्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी महापालिका अधिनियमनाच्या अधीन राहून नगररचना विभागाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे.
– डॉ. पंकज जावळे, आयुक्त, महापालिका
हेही वाचा :