Chhatrapati Sambhajinagar : तिकिटाला पैसे नसल्यामुळे चक्क ट्रॅक्टर चोरले अन् गेला जालन्याला! | पुढारी

Chhatrapati Sambhajinagar : तिकिटाला पैसे नसल्यामुळे चक्क ट्रॅक्टर चोरले अन् गेला जालन्याला!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:  प्रवासाला पैसे नसल्यामुळे चक्क रस्त्यावरील ट्रॅक्टर चोरून जालन्याला पोचलेल्या एका चोरट्याला मुकुंदवाडी पोलिसांनी १० ऑक्टोबरला अटक केली. त्याच्या चोरीची कथा ऐकल्यावर पोलिसांनीही डोक्यावर हात मारून घेतला.

राजेंद्र सखाराम बारबिंडे (३३, रा. बजरंगनगर, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली. अधिक माहितीनुसार, रामनाथ तुकाराम राठोड (५६, रा. नालंदा शाळेजवळ, मुकुंदवाडी) हे फिर्यादी आहेत. त्यांचे ट्रॅक्टर-ट्रॉली (क्र. एमएच २८, डी ०५२९) ७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता इच्छामणी हॉटेलसमोर विमानतळाच्या भिंतीलगत उभे केले होते. ते ट्रॅक्टर चोरीला गेले होते.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक समाधान वाठोर, विशेष पथकाचे उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, सहायक फौजदार नरसिंग पवार, हवालदार बाबासाहेब कांबळे, पोलिस नाईक गणेश वाघ, सुखदेव जाधव, अनिल थोरे, समाधान काळे यांनी तपास सुरू केला. त्यांनी सीसीटीव्ही तपासले. सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने चोराची ओळख निष्पन्न केली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी राजेंद्र बारबिंडे याला पकडले.

Back to top button