Pune Crime : हॉटेल मालकाला एक कोटीचा गंडा; अंडरवर्ल्डला सुपारी देऊन ठार मारण्याची धमकी | पुढारी

Pune Crime : हॉटेल मालकाला एक कोटीचा गंडा; अंडरवर्ल्डला सुपारी देऊन ठार मारण्याची धमकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कॅम्प परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमालकाला तिघांनी 1 कोटी 6 लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली. दरम्यान, संबंधित व्यावसायिकाने पैसे परत मागितले असता, अंडरवर्ल्डला सुपारी देऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी मुख्तार हुसेन मोहम्मद (वय-44, रा. घोरपडी) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अब्दुल हुसेन नईमाबादी (रा. कॅम्प), शोएब मैनुद्दीन अत्तार (रा. बोपोडी), इम्रान लतीफ खान (रा. कोंढवा) या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सप्टेंबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुख्तार मोहमद हे कॅम्प भागातील प्रसिद्ध डायमंड क्वीन हॉटेलचे मालक आहेत. यातील आरोपी अब्दुल नईमाबादी हा बांधकाम व्यावसायिक असून, त्यांच्या परिचयाचा आहे. फिर्यादी हे त्याला 30 वर्षांहून अधिक काळापासून ओळखतात. अब्दुल आणि शोएब यांना कोंढवा भागात एका ठिकाणी बिल्डिंगचे बांधकाम सुरू करायचे असून, त्यासाठी जमीन खरेदी करायचे आहे, असे सांगितले. फिर्यादी यांनी 1 कोटी गुंतवले तर त्यांना 70 लाख रुपये नफा देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

फिर्यादींना विश्वास वाटावा म्हणून जमिनीची कागदपत्रे पाठवली. यानंतर फिर्यादी यांनी 97 लाखांची गुंतवणूक केली. काही महिन्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना बोलण्यास टाळाटाळ केली. यामुळे फिर्यादी यांनी गुंतवलेले पैसे परत मागितले. यामुळे आरोपींनी 35 लाख रुपये परत केले. फिर्यादी यांनी उर्वरित रक्कम मागितली असताना आरोपींनी इम्रान खान याची ओळख करून दिली. इम्रान खान हा नवीन बिल्डिंग बांधत असून, त्याला काही पैसे कमी पडत असल्याचे सांगत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगितले.

यामुळे फिर्यादी यांनी परत एकदा 44 लाख 50 हजारांची गुंतवणूक केली. मात्र फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यावर फिर्यादी हे आरोपींकडे गेले असता, ‘तुला कोठे जायचे आहे तेथे जा. आमची अंडरवर्ल्डमध्ये ओळख आहे. पुन्हा आमच्याकडे आला तर अंडरवर्ल्डला सुपारी देऊन ठार मारू,’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक मोकाटे तपास करीत आहेत.

हेही वाचा

Short hand exam : शॉर्ट हँडची परीक्षा आता ऑनलाइनच; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

जळगाव : वरणगाव येथे अवैध १८ लाखांचा बायोडिझेलचा टँकर पकडला

Israel-Hamas War : हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्रायलवर हल्ला!, युद्धात आतापर्यंत मृतांचा आकडा ५५६ वर

Back to top button