जळगाव : वरणगाव येथे अवैध १८ लाखांचा बायोडिझेलचा टँकर पकडला | पुढारी

जळगाव : वरणगाव येथे अवैध १८ लाखांचा बायोडिझेलचा टँकर पकडला

भुसावळ, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग 53 वरील वरणगाव रोड जुना फेकरी टोल नाका येथे बायोडिझेलची विनापरवानगी वाहतूक करणारा टँकर पकडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.७) करण्यात आली. यावेळी 18 लाख 94 हजार 882 रुपयांचे बायोडिझेल मिळून एकूण 28 लाख 95 हजार 342 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रामचंद्र पवार तपास करीत आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग पोलीस मदत केंद्र पारधी जिल्हा जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लोटेश- सोनवणे, पोलीस हवालदार अनिल सपकाळे, पोलीस नाईक हितेश पाटील, पोलीस शिपाई श्रीकृष्ण चाटे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी भुसावळ तालुक्यातील जुना विक्री टोल नाक्याजवळ टँकरची (जी जे 12 बी एक्स 0 479) तपासणी केली असता त्यामध्ये बायोडिझेल आढळून आले.

याप्रकरणी वाहन चालक महेंद्र कुमार रामविलास यादव (वय 23, पुरे दौलत, पोस्ट डोह, ता. सलोन, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश) वाहन मालक भावेश कुमार समतभाई उडारिया ( पासुदा, ता. अंजार, जि. गांधीधाम, आस्था इम्पेक्स गांधीधाम, गुजरात) यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button