Nagar: ‘डायल 112’ची कामगिरी लय भारी ! काही सेकंदांतच जातो पोलिसांना ‘अलर्ट’ | पुढारी

Nagar: ‘डायल 112’ची कामगिरी लय भारी ! काही सेकंदांतच जातो पोलिसांना ‘अलर्ट’

नगर : कौटुंबिक कारणातून झालेल्या वादाच्या घटना असो किंवा खून, खुनी हल्ला, चोरी, रस्ता लूट, दंगल अशी कोणतीही घटना असो माहिती तत्काळ मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी धाव घेतात. गुन्हा कोणताही असो तो रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली पोलिसांची 112 हेल्पलाइन 24 तास अलर्ट असते. या क्रमांकावर गेल्या दीड वर्षात तब्बल 60 हजार 588 तक्रारी (फोन कॉल) प्राप्त झाल्या असून, काही सेकंदात संबंधित पोलिस ठाण्याला अलर्ट पोहोचला आहे. एकंदरीतच ‘डायल 112’ नागरिकांसाठी देवदूतच ठरत आहे. नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. ‘खाकी’ आपले कर्तव्य दक्षतेने पार पाडत असतानाही अनेक गुन्हे घडतातच. एखाद्या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडत असल्यास पोलिसांना तत्काळ माहिती मिळाली तर पुढील अनर्थ टळतो. पोलिसांची मदत लवकर पोहोचल्यास अनेक गंभीर गुन्हे टळले असून, आरोपीही पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये पोलिसांची 112ची यंत्रणा मोलाची भूमिका बजावत आहे.

संबंधित बातम्या :

केंद्र सरकारकडून 112 ही यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर नगर पोलिस दलात 20 सप्टेंबर 2021 पासून हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज अशी वॉररूम तयार करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून असंख्य कॉल 112ला प्राप्त होत असतात. दिवसाला 100 ते 120 कॉल डायल 112वर येतात. हे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालते. दहा संगणकांच्या माध्यमातून पोलिस कर्मचारी 24 तास जिल्ह्यातून येणार्‍या प्रत्येक कॉलला तत्काळ प्रतिसाद देत असतात.

काम कसे चालते?
डायल 112 चे महाराष्ट्रात मुख्य केंद्र मुंबई (प्रायमरी कॉल सेंटर) व नागपूर (सेकंडरी कॉल सेंटर) येथे आहे. डायल 112 चे सॉफ्टवेअर महिंद्रा डिफेन्स कंपनीने तयार केले आहे. 112 वर कोणी कॉल केल्यानंतर तो कॉल एकाच वेळी मंबई व नागपूर केंद्रावर जातो. कॉल करणार्‍या व्यक्तीचे नाव, लोकेशन माहिती सॉफ्टवेअर लगेच देते. त्यानंतर जिल्हा पोलिस विभागाच्या युनिटला ही माहिती संगणकाद्वारे जाते. त्यानंतर ही माहिती घटनास्थळाच्या जवळ असलेल्या पोलिस ठाण्याला दिली जाते. मॅन्युअल डाटा ट्रान्सफर (एमडीटी) या मशिनच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचतात व घडणारे गुन्हे रोखतात.

डायल 112 का?
मदत क्रमांकासाठी 112 या आकड्याचीच निवड का केली, याचेही कुतूहल काहींना असते. संकटात असलेल्या व्यक्तीजवळ मोबाईल असो किंवा टेलिफोन त्यावर असलेल्या आकड्यांच्या रचनेनुसार जवळील आकडे लवकर दाबता यावेत, यासाठी 112 ची निवड झाल्याचे पोलिस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांनी ‘पुढारी’ला सांगितले.

अशी आहे डायल 112ची टीम
नगर पोलिस मुख्यालयात असलेल्या डायल 112 च्या वॉररूमचे इन्चार्ज म्हणून पोलिस उपनिरीक्षक अंबादास हुलगे काम पाहतात. त्यांच्या मदतीला उपनिरीक्षक संजय सोनवणे, हवालदार कन्हैया मगर, तुप्ती विघ्ने, मनीषा भारती, आशा वाघ, सुजाता वाघ, कविता साठे, दीपाली मते, कविता पैठणकर, नंदिनी झिंजे, पूनम यादव हे पथक 24 तास काम करीत असते. तसेच तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी अभियंता विजय घोलप व संतोष रसाळ हे मदत करतात.

Back to top button