Sujay Vikhe-Ram shinde : खा. सुजय विखे-आ. राम शिंदे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई | पुढारी

Sujay Vikhe-Ram shinde : खा. सुजय विखे-आ. राम शिंदे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई

कर्जत/जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 मधून 19.13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून 20.400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. याबाबत आमदार प्रा.राम शिंदे व खासदार सुजय विखे या दोघांनीही प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर, श्रेय कोणीही घ्या, पण विकास कामे करा, अशी प्रतिक्रिया मतदारसंघातील जनतेतून व्यक्त होत आहे.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेला पुन्हा मोठे गिफ्ट दिले. मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतिमान व्हाव्यात, यासाठी खासदार सुजय विखे व आमदार प्रा. शिंदे यांनी नेहमी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. आ. राम शिंदे यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना मतदारसंघात गाव तिथे रस्ता, वाडी तिथे रस्ता ही मोहीम राबविली. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणल्याचे म्हटले आहे. तर, खा. विखे यांनी नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघात येणार्‍या कर्जत-जामखेडसाठी हा निधी मंजूर करुन आणल्याचे म्हटले आहे.

मंजूर रस्त्यांची कामे अशी ः जातेगाव ते केदारेश्वर मंदिर रस्ता 1 कोटी 44 लाख 84 हजार रुपये. सारोळा ते काटेवाडी रस्ता 1 कोटी 17 लाख 61 हजार, धामणगाव ते जिल्हा हद्द 2 कोटी 7 लाख 52 हजार, पिंपळगाव उंडा ते जगताप वस्ती रस्ता 1 कोटी 38 लाख 39 हजार, आपटी ते गव्हाणवस्ती रस्ता 92 लाख 10 हजार, अरणगाव ते निगुडेवस्ती 1 कोटी 30 लाख 10 हजार रुपये. रावळगाव ते चिंतामणी मंदिर 1.200 किलोमीटर रस्ता 1 कोटी 16 लाख 63 हजार. खांडवी ते माळवाडी रस्ता 1 कोटी 62 हजार, राशीन ते जिराफवस्ती रस्ता 2 कोटी 40 लाख 18 हजार , निंबे ते डोमाळवाडी रस्ता 4 कोटी 12 लाख 91 हजार, सिद्धेश्वर मंदिर बोरमळा ते जुना वाळूंज रस्ता 2 कोटी 12 लाख 69 हजार रुपये.

निधीबद्दल दोघांकडून सरकारचे आभार

कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे या दोघांनीही राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे आभार मानले आहेत.

हेही वाचा

जागतिक स्पर्धेत नंदुरबारचे नाव झळकवणाऱ्या नारायणीची पालकमंत्र्यांकडून दखल

चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाची २२ दिवसांनतर आज सांगता

पिंपरी : विसर्जनासाठी गेलेला तरुण बुडाला

Back to top button