नगर रूग्‍णालय अग्‍नितांडव : जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांसह दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित | पुढारी

नगर रूग्‍णालय अग्‍नितांडव : जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांसह दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित

नगर; पुढारी वृत्तसेवा

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अग्निकांड प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी गंभीर पाऊल उचलत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह इतर दोन वैद्यकीय अधिकारी आणि एका स्टाफ नर्सवर निलंबनाची कारवाई, तर दोन स्टाफ नर्सना कामावरून काढून टाकण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून आरोग्यमंत्री टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

शनिवारी (दि.6) जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील आयसीयूमध्ये आगीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यभरात या घटनेमुळे खळबळ उडाली. रुग्णालय सुरू करण्यात आलेल्या इमारतीचे फायर ऑडिट होऊन त्यात गंभीर त्रुटी आढळल्या होत्या.

या त्रुटींची पूर्तता न करताच इमारतीचा वापर करण्यात आला. परिणामी, आगीच्या घटनेनंतर रुग्णांना वाचविण्यात अडथळे आले. या प्रकरणी कारवाईसाठी सरकारवर दबाव वाढला होता.

अखेर मंत्री टोपे यांनी कारवाईची घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांचा समावेश आहे. तर स्टाफ नर्स आस्मा शेख आणि स्टाफ नर्स चन्ना आनंत यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Back to top button