नगर : पोलिसांचा सायरन वाजला अन् २६ लाखांची रोकड वाचली… | पुढारी

नगर : पोलिसांचा सायरन वाजला अन् २६ लाखांची रोकड वाचली...

श्रीगोंदा ; पुढारी वृत्‍तसेवा

तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चार ते पाच दरोडेखोरांनी फोडले होते. ते घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा सायरन वाजल्याने दरोडेखोरांनी एटीएम मशीन रस्त्यातच टाकून पोबारा केला. पोलिसांचा सायरन वाजल्याने एटीएम मशिनमधील २५ लाख ९९ हजारांची रोकड वाचली. दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशियतास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तीन पैकी एका आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

आज (सोमवार) पहाटेच्या दरम्यान चार ते पाच दरोडेखोरांनी नगर- दौंड राष्ट्रीय महामार्गानजीक असणाऱ्या स्टेट बँकेच्या एटीएम मशीनच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. मशीन तोडून उचलून घेऊन जात जाण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्‍न होता. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलीस वाहनाच्या सायरनचा आवाज आल्याने दरोडेखोर एटीएम मशीन टाकून पळून गेले.

घटनास्थळास पोलिस उपअधीक्षक आण्णा जाधव, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोणीव्यंकनाथ येथील हे एटीएम मशीन फोडण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. एटीएम मशीन फोडणे प्रकरणात स्थानिक खबऱ्याचा हात असल्याचा पोलीस यंत्रणेचा कयास आहे. पोलिसांना या टोळीचे धागेदोरे मिळाले असून, लवकरच ही टोळी जेरबंद होईल असा विश्वास पोलीस यंत्रणेने व्यक्त केला.

Back to top button