नगर जिल्ह्यातील 261 गावांची पैसेवारी कमी ; खरिपाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर | पुढारी

नगर जिल्ह्यातील 261 गावांची पैसेवारी कमी ; खरिपाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 585 खरीप हंगामी गावांपैकी 324 गावांतील पिकांची नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली आहे. मात्र, 261 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. यामध्ये सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील 164 गावांचा समावेश आहे. प्रत्यक्षात पीक कापणी प्रयोगानंतर 15 डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. या पैसेवारीत ज्या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असतील त्या गावांना दुष्काळी सवलती जाहीर होणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण 1 हजार 606 महसुली गावे आहेत. त्यापैकी 585 गावे खरीप हंगामासाठी निश्चित केले आहेत. उर्वरित गावे 1 हजार 21 गावे रब्बी हंगामासाठी आहेत. संगमनेर तालुक्यातील सर्व 174 व अकोले तालुक्यातील सर्व 191 गावे खरीप हंगामात समाविष्ट आहेत. याशिवाय कोपरगाव तालुक्यातील 16, राहाता तालुक्यातील 24, राहुरी तालुक्यातील 17, नगर 5, नेवासा 13, पाथर्डी तालुक्यातील सर्व 80, शेवगाव 34 व पारनेर तालुक्यातील 31 गावे खरीप हंगामात समाविष्ट आहेत.

पिकांच्या पैसेवारीवरच गावांची दुष्काळी वा सुकाळ परिस्थिती निदर्शनास येते. त्यासाठी पेरणी झाल्यानंतर 15 सप्टेबर रोजी नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली जाते. यासाठी गावपातळीवरील पैसेवारी समितीच्या वतीने शेताच्या बांधावर उभे राहून पिकांचा नजर अंदाज घेतला जातो. या अंदाजावर गावनिहाय नजर पैसेवारी जाहीर केली जात आहे.

साडेतीन महिन्यांत फक्त 50 टक्के पावसाची नोंद आहे. अशा परिस्थितीत खरीप पेरणी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. गावागावांतील पैसेवारी समितीने पीक पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर महसूल यंत्रणेने नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. खरीप पिकांची सुधारित पैसेवारी 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर अंतिम पैसेवारी 15 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. अंतिम पैसेवारीत ज्या गावांची पैसेवारी कमी येईल, त्या गावांना दुष्काळी सवलती मिळणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आता 15 डिसेंबरच्या पैसेवारीची वाट पाहावी लागणार आहे. पावसाची तूट लक्षात घेऊन राज्य शासन 15 डिसेंबरपूर्वी देखील सर्वच खरीप गावे दुष्काळी जाहीर करण्याची शक्यता आहे.

रब्बीतील 179 गावांत कमी पैसेवारी
रब्बी गावांत 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आल्यास त्या रब्बी गावांची खरीप हंगाम नजर अंदाज पैसेवारी घेतली जाते. त्यानुसार 1 हजार 21 रब्बी गावांपैकी 842 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली आहे. केवळ 179 गावांची नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील सर्वच 63 गावे, राहाता तालुक्यातील 37, राहुरी तालुक्यातील 79 गावांचा समावेश आहे. र्ें

कमी पैसेवारीची गावे
संगमनेर : 164,
अकोले : 40
कोपरगाव : 16
राहाता : 24
राहुरी : 17
अधिक पैसेवारीच्या गावांची संख्या
अकोले : 151
संगमनेर : 10
नेवासा : 13
पाथर्डी : 80
शेवगाव : 34
पारनेर : 31

हेही वाचा :

महिला आरक्षणाचं स्वागत, पण ओबीसींचे काय? : राहुल गांधी

HSC-SSC Time Table : दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक कधी ? परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून विचारणा

Back to top button