श्रीगोंदा शहराला पुन्हा अतिक्रमणांचा विळखा | पुढारी

श्रीगोंदा शहराला पुन्हा अतिक्रमणांचा विळखा

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  मागील वर्षी श्रीगोंदा नगरपालिकेने रस्त्यालगतची हटविलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. ही अतिक्रमणे वाहतुकीस अडथळा ठरत असताना पालिका प्रशासन कारवाईबाबत पावले उचलताना दिसत नाही. मे 2022 मध्ये तत्कालीन नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पुढाकार घेऊन श्रीगोंदा शहरातील, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून शहराचा श्वास मोकळा केला होता. अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत, याबाबत खबरदारी घेतली होती. मात्र, त्यांची अन्यत्र बदली झाल्याने व्यावसायिकांनी आपली दुकाने रस्त्याच्या कडेला थाटण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या :

दोन दिवसांपूर्वी एका फळविक्रेत्याने ग्राहकाशी झालेल्या शाब्दिक वादावादीतून कोयत्याने वार करून ग्राहकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्रापूर-परळीसारखा महत्त्वाचा रस्ता शहराचा मध्यमागातून गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांची गर्दी वाढली आहे. या रस्त्यावरील बसस्थानक परिसर ते बाजार समितीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला अतिक्रमणे झाली आहेत. या रस्त्यावर फळविक्रेत्यांनी बेकायदा दुकाने थाटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा होतो आहे. बसस्थानक परिसरात, तर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. रस्त्यावर दुकाने असल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध वाहने उभा करून दुकानात खरेदीला जातात. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यातून अनेकदा वादावादीच्या घटनाही घडल्या आहेत.

त्याचबरोबर शनिचौक, मांडवगण रस्ता या भागांतही अनेक मंडळींनी अतिक्रमणे करून आपली दुकाने थाटली आहेत. नगरपालिका प्रशासनाने याबाबत संबंधितांना वारंवार नोटिसा बजावूनही अतिक्रमणधारक त्याला दाद देत नाहीत. दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाने पोलिस यंत्रणेकडे अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा पोलिस बंदोबस्त वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने नगरपालिका प्रशासन हतबल झाले आहे.

पदाधिकारी उदासीन का?
अतिक्रमणे ही शहरासाठी शोभणीय बाब नक्कीच नाही. इतर वेळी कामात हस्तक्षेप करणारे पदाधिकारी अतिक्रमणे हटविण्यासाठी एवढे उदासीन का आहेत. शहराचा श्वास मोकळा करायचा असेल, तर ही अतिक्रमणे तातडीने हटविणे गरजेचे आहे.

पोलिस यंत्रणेकडून असहकार
सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे म्हणाले, नगरपालिकेने अतिक्रमणे काढण्यासाठी वारंवार पोलिस बंदोबस्त मागितला. मात्र, तो दिला गेला नाही. परिणामी अतिक्रमणांचा विळखा शहराला पडला आहे.

शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागितला आहे. गणेश विसर्जन झाल्यानंतर पोलिस बंदोबस्त देण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी मान्य केले. गणेश विसर्जन झाल्यानंतर तातडीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार आहोत.
                                   – प्रमोद ढोरजकर, मुख्याधिकारी, नगरपालिका.

Back to top button