कर्जत : नुकसान भरपाईत तलाठ्याची टक्केवारी; थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार | पुढारी

कर्जत : नुकसान भरपाईत तलाठ्याची टक्केवारी; थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

कर्जत/मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील कुळधरणच्या तलाठी कार्यालयात गेल्या वर्षीच्या अतिवृष्टी अनुदानात मोठा घोटाळा झाला आहे. यात कित्येक शेतकर्‍यांना अनुदान लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार बंडू गंगाधर सुपेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार सध्या भरपाईचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा केले जात आहे. मात्र, कुळधरणच्या तलाठी कार्यालय हद्दीत अतिवृष्टीने बाधित क्षेत्राचे चुकीचे पंचनामे करण्यात आले.

जास्त नुकसान होऊनही काही शेतकर्‍यांचे केवळ पाच-दहा गुंठे क्षेत्र दाखविण्यात आले. अनेक शेतकर्‍यांना पंचनाम्यातून वगळण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अनेक शेतकर्‍यांचे क्षेत्र जिरायत व पडीक आहे. त्या क्षेत्रात कोणत्याही पिकाची लागवड करण्यात आली नव्हती. तरीही कागदावरच खोटे व चुकीचे पंचनामे करून त्या शेतकर्‍यांना भरपाईचा आर्थिक लाभ देण्यात आला. कुळधरणचे तलाठी व संबंधित कर्मचार्‍यांनी अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पिके नसतानाही पंचनामे केले होते.

मात्र, भरपाई आल्यानंतर त्यातील 50 टक्के रकमेचा वाटा हा तलाठ्यांना देण्याबाबत शेतकर्‍यांकडून ठरवून घेतले आहे. त्यामुळे खोटे पंचनामे करून शेतकर्‍यांना अनुदानाचा लाभ देऊन त्यात तलाठी आर्थिक भागीदार होत आहेत. त्यामुळे मूळ लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले असून, चुकीच्या शेतकर्‍यांना भरपाई देण्यात आली आहे. खडकाळ, डोंगर, पाण्याची सुविधा नसलेल्या पडीक क्षेत्राचाही पंचनामा केल्याने त्यांच्या नावे अनुदान जमा झाले आहे. या प्रकाराची पथकाकडून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

Shivshakti Parikrama : पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज जामखेडला

छत्रपती संभाजीनगर : २ लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ७ जणांविरोधात गुन्हे

पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

Back to top button