पावसामुळे खरीप पिकांना जीवदान | पुढारी

पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविलेल्या पावसाने गुरुवारी (दि. 7) रात्रीपासून उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यांत सर्वदूर जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी (दि. 8) दिवसभर पाऊस सुरू होता. पावसाच्या हजेरीने संकटात सापडलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा या पावसामुळे सुखावला. यंदा खरीप हंगाम संपत आला, तरी समाधानकारक पाऊस पडला नाही. अधूनमधून होणार्‍या तुरळक पावसावर शेतकर्‍यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या.

परंतु, जुलै-ऑगस्ट महिन्यांतच पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतली. यामुळे भात, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, भुईमूग पिकांसह संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला. पिके पावसाअभावी जळू लागली. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊसच न झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीदेखील खाली गेली आहे. यामुळेच शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. परंतु, कृष्णजन्माष्टमीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भात, सोयाबीनला फायदेशीर
जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते. शंभर टक्के म्हणजे 23 हजार 715 हेक्टर क्षेत्रावर भाताची लावणी झाली. सध्या अनेक भागांत भात पीक फुलोर्‍यात आले आहे. चांगले पीक येण्यासाठी जोरदार पावसाची गरज होती. गुरुवारपासून जोरदार पाऊस पडला. तो भात पिकाला पोषक ठरणार आहे. सोयाबीनलादेखील याचा फायदा होणार आहे.

धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस
जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांतील धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. या तीन तालुक्यांतील भामा आसखेड, चासकमान, आंद्रा, वडिवळे धरणांत 90 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पातील माणिकडोह, पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे आदी धरणे अद्यापही पूर्णक्षमतेने भरलेली नाहीत. गुरुवारपासून (दि. 7) धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ही धरणे भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

निकषात पुणे जिल्ह्यातील दुष्काळ बसेना !

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मराठा आंदोलकांचे शिष्‍टमंडळ जरांगेंच्या भेटीला, निर्णयाकडे लक्ष

Back to top button