धो-धो पाऊस पडू दे.. राज्यातला दुष्काळ हटू दे! आ. आशुतोष काळेंचे साकडे | पुढारी

धो-धो पाऊस पडू दे.. राज्यातला दुष्काळ हटू दे! आ. आशुतोष काळेंचे साकडे

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : निर्माण झालेल्या बिकट दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापुजा केली. भरपूर पाऊस पडू दे.. राज्यावरील दुष्काळाचे सावट हटू दे, असे साकडे त्यांनी दत्त महाराजांना घातले. कोपरगाव मतदार संघ पर्जन्य छायेखाली येत असल्यामुळे दरवर्षी मतदार संघात इतर तालुक्याच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते, परंतु राज्यात यंदा सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, तुर आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. रब्बी हंगामाचे भवितव्य देखील टांगणीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघासह दुष्काळी परिस्थिती असलेल्या सर्व भागात वरूण राजाने कृपा करावी, दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापुजा करून साकडे घातले. सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती चिंताजनक आहे. याचा सर्व घटकांवर परिणाम होत आहे. खरीप पिके जळाली आहे. बाजार पेठेत शुक-शुकाट निर्माण झाल्याने छोट्या- मोठ्या व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. सर्वसामान्यांना देखील या दुष्काळी परिस्थितीची झळ बसली आहे. यावेळी माहेगाव देशमुखसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

आवाहनास प्रतिसाद..!

मतदार संघातील नागरिकांनी देखील आपापल्या गावातील धार्मिक स्थळी पावसासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले होते. त्यास कोपरगाव शहरासह मतदार संघातील सर्व गावातील नागरिकांनी प्रतिसाद देवून ग्रामदैवताला मनोभावे प्रार्थना करून साकडे घातले. दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली.

हेही वाचा

रायगड : रोह्यात जोरदार पाऊस; शेतकरी सुखावला, भातशेतीला पोषक

कर्जत : तुकाई उपसा योजनेसाठी ‘रास्ता रोको’

पुणे : पाण्याची साठवणूक न झाल्याने टंचाई

Back to top button