अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्यामुळे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी राजूरचे सरपंच पुष्पा दत्तात्रय निगळे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी अपात्र ठरविले आहे. निगळे यांचे सदस्यत्व रदृ झाल्याने अकोले तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राजूर ग्रामपंचायतीची निवडणूक 19 सप्टेंबर 2022 रोजी झाली. पुष्पा निगळे सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
विद्यमान सरपंच पुष्पा निगळे आणि त्यांचे पती दत्तात्तय निगळे यांनी ग्रामपंचायतीची मालकी असलेल्या जागेवर अतिक्रमण करीत घर आणि ऑफिसचे बांधकाम केले असा विवाद अर्ज राजूर येथील रहिवासी गणपत एकनाथ देशमुख यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1) (ज-3) व 16 प्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. विद्यमान सरपंच यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांना सदस्यपदावर अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणी अर्जदार गणपत देशमुख व सरपंच पुष्पा निगळे यांना सुनावणीसाठी उपस्थित राहाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 7 ऑगस्ट 2023 रोजी सुनावणी घेतली. या सुनावणीत अर्जदार देशमुख आणि सरपंच निगळे यांनी लेखी म्हणणे सादर केले. याकामी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आपला अहवाल सादर केला.
त्यांच्या अहवालानुसार सरपंच पुष्पा निगळे यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिध्द झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पुष्पा निगळे यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिलेल्या या निकालाविरोधात नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पंधरा दिवसांच्या आत अपील करण्याची संधी पुष्पा निगळे यांना दिली आहे.
हेही वाचा