गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : वीस पंचवीस दिवसांच्या विश्रांतीनंतर गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोरेगावसह परिसरात वरुणराजाने आगमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Mumbai)
जुलै पहिल्या आठवड्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणी झाली. पेरणी नंतर जोरदार पावसाने झोडपले. त्यांनंतर दहा बारा दिवस पावसाने उघडीप दिली होती. उघडीपीत शेतकऱ्यांनी कोळपणीची कामे पूर्ण करुन घेतली होती. पिकेही तरारली. पिके पाहिजे तशी होती. मात्र मध्यंतरी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा वरुणराजा रुसला होता. पिके फुल अवस्थेत असताना वीस पंचवीस दिवसाची विश्रांती घेतल्याने उत्पादनात घट तर होणारच. असे शेतकऱ्यांना निश्चित माहिती होती. सर्वत्रच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
शेतकऱ्यांना चारा पाण्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा राहिला होता. पाळीव जनावरे पाळणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले होते. वीस पंचवीस दिवसांच्या विश्रांतीनंतर गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर (दि ६) रिमझीम पावसाने आगमन केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आज (दि ७) सकाळपासुन गोपाळकाल्याच्या दिवशी वरुणराजा धो धो बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असुन, गोविंदा पावला असल्याचेही भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा