अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप त्यात सर्वांत पुढे. नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागा 'इंडिया'तील कोणता पक्ष लढणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरी काँग्रेस, ठाकरे सेना तयारीला लागलेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आ. नीलेश लंके हे अजित पवार गटात गेल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी बॅकफुटवर गेली. हीच संधी साधत काँग्रेस, सेनेने नगरच्या जागेवर दावा ठोकत तयारी सुरू केली. काँग्रेसने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून पदयात्रेच्या निमित्ताने घरोघरी जाण्याला प्रारंभ केला, पण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या 'एककल्ली कार्यक्रमा'मुळे नमनालाच काँ्रगेसमधील धूसफूस चव्हाट्यावर आली. त्याची झळ कारण नसतानाही माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांना सोसावी लागली.
काँग्रेसचा 'हात' विस्कटत असताना दुसरीकडे ठाकरे सेनेकडून मात्र माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांचा 'क्लीन फेस' पुढे करत 'मशाल' पेटविली जात आहे. शिर्डीतही ठाकरे सेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नावाभोवती चर्चा सुरू आहे. ठाकरे सेनेची 'मशाली'ची धग तेवत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'घडी' मंदावल्याचे चित्र आहे. 'इंडिया'तील काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेतील विसंवाद हा भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसते आहे. भाजप आणि शिंदे सेनेकडून विद्यमानांनी दंड थोपटले असताना विरोधी 'इंडिया' मात्र सैरभर असल्याचे दिसते आहे.
स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी तब्बल सात वेळेस प्रतिनिधित्व केलेला शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आरक्षणानंतर मात्र सेनेच्या वर्चस्वाखाली आला. भाजपला नेहमीच अनुकूल असलेला नगर दक्षिण जागावाटपात राष्ट्रवादीकडे आहे. आ. नीलेश लंके यांना पाठबळ देत शरद पवारांचा संभाव्य उमेदवार म्हणून लंके यांच्याकडे पाहिले जात होते.
मात्र हेच लंके राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे शरद पवारांकडे 'पॉवरफुल्ल' उमेदवार राहिला नाही. घड्याळाची टिकटिक मंदावली. अजित पवार-शरद पवार यांच्यातील राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर नगर जिल्ह्यात 'आधे इधर, आधे उधर' अशी स्थिती झाली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके फारसे कोठे दिसत नाहीत. आ. रोहित पवार जिल्ह्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. तीच संधी साधत काँग्रेस, सेनेकडून नगरच्या जागेवर दावा ठोकत तयारी सुरू केली आहे.
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी शिर्डी, नगरमध्ये चाचपणी केली. नगरमधून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उमेदवारीची मागणी पुढे आली. त्यानंतर आ. थोरात यांनी नगरचे दौरे सुरू केले. त्यातच 'जनसंवाद' यात्रा सुरू झाली. यात्रेची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर आली. ज्ञानदेव वाफारे त्यांच्या जोडीला समन्वयक म्हणून आले. उत्तर महाराष्ट्राची सुरुवात नगरमधून करण्यात आली, मात्र 'वजनदार' असलेल्या नागवडे यांना जिल्ह्यातील पदाधिकारीही जमविता आले नाहीत.
अनेक पदाधिकारी तर 'जनसंवाद' यात्रेच्या निरोपापासून अनभिज्ञ असल्याचे समोर आले. वास्तविक नागवडे यांच्या सौभाग्यवती अनुराधा याही काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष. असे असतानाही नागवडे यांची कार्यपद्धती पाहता काँग्रेस 'लिमिटेड' झाली की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. वास्तविक आ. थोरात यांचा कार्यक्रम इतिहास पाहता धडाक्यात असतो; पण त्यांनी ही सर्वस्वी जबाबदारी जिल्हाध्यक्ष नागवडे यांच्यावर टाकली, अन् थोरातांच्या लिटमस टेस्टमध्ये नागवडे सपशेल फेल झाल्याचे दिसले.
कोणत्याही परिस्थितीत श्रीगोंद्यातून विधानसभा लढायची, अशी खूणगाठ नागवडेंनी बांधली आहे. त्यामुळेच तर जिल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत नाही ना, अशीही कुजबूज आहे. जिल्ह्यातील 'हाता'ची विस्कटलेली घडी सावरण्याकरिता यापुढे आ. थोरात हे जबाबदारी टाकताना शंभरदा विचार करतील, हे कोणी सांगण्याची गरज नाही.
ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नगर, शिर्डीच्या बैठका घेत ते उमेदवारी फायनलच्या निष्कर्षापर्यंत पोहचल्याचा सूत्रांचा दावा आहे. ठाकरे सेनेच्या उत्तर, दक्षिण दोन्ही जिल्हाप्रमुखांनी 'मशाल' तेवत ठेवलीय. नगरमधून अचानक ठाकरे सेनेकडून माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांचे नाव समोर आले.
भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर केवळ गडाखच आव्हान उभे करू शकतील, 'प्रवरा' यंत्रणेला फाईट करण्याची क्षमता केवळ 'मुळा'तच असल्याची बाब मविआच्या वरिष्ठांनी ठाकरेंना पटवून दिली. त्यामुळेच गडाखांचे नाव चर्चेत आले. गडाखांची इच्छा असो-नसो, आता सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे. ठाकरे हे दुष्काळी स्थिती पाहण्याकरिता शुक्रवारी (दि.8) जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यातच ते राजकीय खलबते करत मशाल धगधगती ठेवण्यासाठी उमेदवारीसंदर्भात कानगोष्टी करतील, अशी शक्यता वर्तविली जाते.
भाजपने लोकसभेची तयारी करत नगर, शिर्डीत शक्तीप्रमुख, बूथ प्रमुखांसह पदाधिकार्यांच्या बैठका घेत वातावरण निर्मितीला सुरुवात केली. विद्यमान खा. सुजय विखे कमालीचे सक्रिय झाले आहेत. शिंदे सेनेचे खा. सदाशिव लोखंडे हेही जोमात आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नगर दौरे वाढले अन् त्यांनीही शिर्डीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. उमेदवार कोण? या फंदात न पडता भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र विरोधी 'इंडिया'त अजूनही उमेदवारीचाच घोळ सुरू आहे.
हेही वाचा