नाशिक : पिंपळगावला शेतकऱ्यांनी रोखले लिलाव | पुढारी

नाशिक : पिंपळगावला शेतकऱ्यांनी रोखले लिलाव

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोपाठोपाठ सर्वच भाजीपाल्यांचे भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. सिमला मिरची, श्रावण घेवडा खरेदी करण्यास भाजीपाला व्यापाऱ्यांनी साफ नकार दिला, तर हिरवी मिरची, दोडका, कारले यांना मातीमोल भाव मिळत आहे. शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव मोरे व पिंपळगाव बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांच्या मध्यस्थीनंतर लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो भावातील घसरणीनंतर भाजीपाला भावातही मोठी घसरण झाली. सिमला मिरची, श्रावण घेवडा खरेदी करण्यास भाजीपाला व्यापाऱ्यांनी साफ नकार दिला आणि हिरवी मिरची, दोडका, कारले यांना मातीमोल भाव पुकारण्यात आल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी भाजीपाला लिलाव बंद पाडून व्यापारी, बाजार समिती प्रतिनिधी यांना चांगलेच धारेवर धरले. ही माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव मोरे पिंपळगाव बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांनी बाजार आवारावर धाव घेतली व रास्त भाव देण्याचे आवाहन करत मध्यस्थी केली व पुनश्च लिलाव सुरू करण्यात आले. तत्पूर्वी 30 रुपये क्रेटप्रमाणे पुकारण्यात आलेला दोडका शंभर रुपये क्रेटने विकला गेला तर सिमला मिरची, श्रावण घेवडा, कारले यांनाही समाधानकारक भाव मिळाला. दरम्यान, शेतमालाला योग्य भाव दिला जावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा साहेबराव मोरे यांनी दिला.

Back to top button