Crime news : चोरीच्या दुचाकीने फोडले प्रेमाच्या त्रिकोणाचे बिंग; मजनूसह पाच अटकेत | पुढारी

Crime news : चोरीच्या दुचाकीने फोडले प्रेमाच्या त्रिकोणाचे बिंग; मजनूसह पाच अटकेत

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : एकाच महिलेवर दोघे भाळले अन् प्रेमाचा त्रिकोण तयार झाला. मात्र, प्रेमात अडसर ठरत असल्याने त्यातील एकाने दुसर्‍या ‘मजनू’चा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. सहा जणांच्या टोळीने त्याला धमकावत मारहाण केली आणि चोरीचा बनाव करण्यासाठी दुचाकी व रोख पळविली होती. ‘एलसीबी’ने सुपारी देणार्‍या मजनूसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला पण तो दुसर्‍याच एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीमुळे आणि त्याच्याकडील चोरीच्या दुचाकीमुळे…

या गुन्ह्याची कहाणीही रंजक आहे. पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करीत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. गुन्ह्यांची उकल करताना अनेक क्लृप्त्या लढविल्या जातात अन् यातूनच काही वेळा मोठे यश पोलिसांना येते. सुतावरून स्वर्ग गाठणे, या म्हणीला साजेसा तपास पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर एलसीबीच्या टीमने केला. तडीपारीच्या आदेशाचा भंग करणार्‍या आरोपींना पुन्हा उचलून हद्दीच्या बाहेर फेकण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. अशाच आरोपींच्या मुसक्या एलसीबीकडून आवळल्या जात आहेत.

असाच एक हद्दपार आरोपी स्वप्नील वाघचौरे (रा. भिंगार) हा घरी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. एलसीबीच्या पथकाने आरोपीला घरून उचलले व चौकशी सुरू केली. त्याच्याकडे असलेल्या विनाक्रमांकाच्या दुचाकीबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने चेचीस नंबरवरून मूळ मालकाचा शोध घेतला अन् तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचे बिंग फुटले.

आरोपीला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सांगितले, की अशोक नामदेव जाधव (रा. शाहुनगर, केडगाव) याने संदीप मच्छिंद्र वाघ (रा.खंडाळा, ता. नगर) यांना जीवे ठार मारून चोरीचा बनाव करण्यासाठी 70 हजार रुपयांची सुपारी दिली होती. वाघ यांची सुपारी देण्यामागे अनैतिक प्रेमसंबंधाची किनार होती. त्यानंतर आरोपींनी केडगाव भागात वाघ यांना अडवून मारहाण करीत त्यांची दुचाकी व पाच हजार रोख चोरून नेले होते. मात्र, चोरीतील त्याच दुचाकीने आरोपींना कोठडीपर्यंत नेले. दोघांत तिसरा अडसर ठरत असल्याने त्याला मारण्याची सुपारी देणार्‍या सराईत टोळीच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या.

पाच जणांना अटक, दोन पसार

स्वप्नील सुनील वाघचौरे व रवींद्र विलास पाटोळे (दोन्ही रा. भिंगार), अशोक नामदेव जाधव (रा. केडगाव), प्रताप सुनील भिंगारदिवे व विशाल ऊर्फ झंडी लक्ष्मण शिंदे (दोन्ही रा. सावतानगर, भिंगार) या पाच आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. रवींद्र धीवर, संदीप पाटोळे हे दोन आरोपी पसार आहेत. यातील चार आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी स्वप्नीलवर खुनी हल्ला, विनयभंग, गंभीर दुखापत असे 8 गुन्हे दाखल आहेत. अशोक जाधववर दुखापत व फसवणूक असे दोन गुन्हे, तर प्रतापवर खुनी हल्ला, विनयभंग, गंभीर दुखापतीचे 5 गुन्हे दाखल आहेत. विशालवर चोरी, दुखापत असे 3 गुन्हे दाखल आहेत.

या पथकाची मेहनत फलद्रुप

पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, उमाकांत गावडे, भरत बुधवंत या पथकाची मेहनत फलद्रुप झाली.

हेही वाचा

PM Crop Insurance : पाऊस न पडल्याने झालेल्या नुकसानीचा पीक विमाही नाही

Ahmednagar Lok Sabha Election : पडद्याआड : ‘हात’ विस्कटला, ‘घडी’ मंद; मशालीची मात्र धग..!

Jaggery Price: साखरेपाठोपाठ गूळही महागला

Back to top button