अहमदनगर : पारंपरिक, डीजेमुक्त गणेश मंडळांना यंदा पारितोषिके; जिल्हा प्रशासनाची घोषणा | पुढारी

अहमदनगर : पारंपरिक, डीजेमुक्त गणेश मंडळांना यंदा पारितोषिके; जिल्हा प्रशासनाची घोषणा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : डीजेचा अतिरेक, मिरवणुकांमध्ये अशोभनीय संगीतावर होणारे हावभाव याला फाटा देणार्‍या व डीजेमुक्त तसेच पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून सामाजिक प्रबोधन करणार्‍या मंडळांना यंदा जिल्हा प्रशासनातर्फे पारितोषिक देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून तसेच शहरी भागातून उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केली.

आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे उत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडावे यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गणेश मंडळांच्या सदस्यांनी आपल्या तक्रारी जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या. जिल्हा प्रशासनाकडून तक्रारींचे निरसण करून काही सूचना केल्या.

मंडळांना सीसीटीव्ही लावण्याच्या सक्त सूचना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या वेळी दिल्या.मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे आणि रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून रस्ते मोकळे करावेत, अशा सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच, उत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेत कंट्रोल रूम सुरू करणार असल्याचे बैठकीत सांण्यात आली.

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपत भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व मधुकर साळवे आदी अधिकारी उपस्थित होते.

एक खिडकी योजना कागदावरच

गणेश मंडळांच्या विविध परवान्यांसाठी महापालिका कार्यालयात एक खिडकी योजना दर वर्षी सुरू करण्यात येते. मात्र, ही योजना कागदावरच राहत असल्याची तक्रार गणेश मंडळांच्या सदस्यांनी केली. यावर जिल्हाधिकार्‍यांनी पालिका प्रशासनाला यंदा असे होता कामा नये, असे निर्देश दिले.

..तर कारवाई होणारच

पोलिस प्रशासनाकडून डीजे वाजवल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केला. यावर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करीत डीजेच्या आवाजाची तीव्रता मोजूनच कारवाई होत असल्याचे सांगितले. तसेच, आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई होणारच, अशी रोखठोक भूमिका ओला यांनी मांडली.

वर्गणीसाठी जबरदस्ती होता कामा नये

गणेशोत्सव काळात वर्गणीसाठी जबरदस्ती करण्यात आल्याचे प्रसंग या आधी घडले आहेत. तशा तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई होणार असल्याचा गर्भीत इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी बैठकीत दिला. कोणालाही वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

Lalit Modi : सुष्मिता सेननंतर ललित मोदी सुपर मॉडल उज्ज्वला राऊतच्या प्रेमात?

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शरद पवार एकाच मंचावर

अमेरिकन ग्रीन कार्डचा प्रतीक्षा कालावधी तब्बल १३४ वर्षे !!!

Back to top button