अहमदनगर : बांधकामासाठी अट शिथिल करावी; शिवसेनेचे संरक्षणमंत्र्यांना निवेदन | पुढारी

अहमदनगर : बांधकामासाठी अट शिथिल करावी; शिवसेनेचे संरक्षणमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरात लष्करी संस्थांजवळील बांधकामासाठी अंतराची अट संरक्षण विभागाकडून शिथिल करण्यासह, भिंगार छावणी हद्दीतील विविध प्रश्नांचे निवेदन शिवसेनेच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देण्यात आले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख (दक्षिण) सचिन जाधव यांनी प्रवरानगर येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, नगरसेवक संजय छजलानी, रवींद्र लालबोंद्रे आदी उपस्थित होते. पश्चिमेकडे सीना नदीची पूररेषा, तर पूर्वेला लष्कराची जमीन व संस्था असल्याने शहरातील नागरिकांना बांधकाम करण्यास मोठी अडचण येत असल्याकडे लक्ष वेधले.

लष्करी संस्थालगत एक मजली बांधकाम करावयाचे असल्यास 100 मीटर, तर बहुमजली बांधकाम करावयाचे असल्यास 500 मीटर अंतर सोडण्याचा संरक्षण विभागाचा नियम आहे. त्यामुळे शहराच्या विस्ताराला व पर्यायाने विकासालाही मर्यादा आल्या आहेत. शहर व परिसरात लष्कराचे मोठे क्षेत्र आणि संस्था आहेत. या संस्थालगत नागरिकांच्या खासगी मालमत्ता आहेत. मात्र, कठोर नियमांमुळे नागरिकांना त्या जागांचा योग्य पद्धतीने विकास करता येेत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

तसेच लष्कराच्या बनावट एनओसीचेही प्रकार नगर शहरात घडले आहेत. हे टाळण्यासाठी अंतराची अट संरक्षण विभागानेच शिथिल करावी. तसेच, महापालिका हद्दीत प्रभाग क्र.10 मधील रामवाडी, कोठला, गोकुळवाडी, कौलारू कॅम्प हे शहरातील मध्यवर्ती भाग आहेत. या भागात 50 वर्षांपासून लोकांचा रहिवास आहे. या भागात सर्वसामान्य, गोरगरीब लोक राहतात. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी भाग आहे. परिसरातील जागा ही संरक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या छावणी परिषदेची आहे.

हे क्षेत्र महापालिकेने हस्तांतरित करून घेण्याबाबत संरक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. याबाबत संरक्षण विभाग, राज्य सरकार व महापालिका यांनी सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून घेत स्थानिक रहिवाशांना विना मोबदला अथवा नाममात्र दरात जागा नावावर करून देण्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे भिंगार छावणी हद्दीतील बेल्हेश्वर मंदिर, वीर गोगादेव महाराज मंदिर संरक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सुरक्षा व इतर कारणांमुळे मंदिर लष्कराकडून बंद ठेवले जाते. हे मंदिर कायम स्वरूपी दर्शनास उघडे करावे, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा

लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील : अनिल देशमुख

अहमदनगर जिल्ह्यात उसाला एक नंबरचा भाव देणार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा : विजय वडेट्टीवार

Back to top button