कोळपेवाडी : आगाऊ पिक विम्याचा अध्यादेश काढण्यास विलंब नको : आ. काळे | पुढारी

कोळपेवाडी : आगाऊ पिक विम्याचा अध्यादेश काढण्यास विलंब नको : आ. काळे

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात दीर्घ काळ पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी झाली असून शेतकर्‍यांना तातडीने आगाऊ 25 टक्के पिक विमा देण्यासाठी अध्यादेश काढण्यात विलंब न करता तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे पत्राद्वारे केली. आ. काळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले, कोपरगाव मतदार संघातील मंडलात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली.

खरीप हंगामातील बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग आदी पिके वाळून चालल्याने शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडणार नाही. याची दखल घेवून मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे यापूर्वीच केलेली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून मतदार संघातील शेतकर्‍यांना आगाऊ पिक विमा भरपाई द्यावी, अशी मागणी देखील केली होती. तसेच दुष्काळ जाहीर करून दुष्काळाची पाहणी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली होती.

मागणीनुसार संपूर्ण मतदारसंघात पाहणी पूर्ण झालेली आहे. मतदार संघातील एकूण 45,062 शेतकर्‍यांनी बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिकांचे 64,023 पिक विमा अर्ज भरलेले आहे. शासन निर्णय व तरतुदी नुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे उत्पनात घट होणार असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे. याबाबत काही जिल्ह्यात अध्यादेश प्रसिद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.

मतदार संघातील शेतकर्‍यांना मदतीची अत्यंत गरज असून या मदतीमुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील शेतकर्‍यांना आगाऊ 25 टक्के पिक विमासाठी तातडीने अध्यादेश जाहीर करावा अशी मागणी आ. काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

राज्यांतील मंत्र्यांकडेही केली मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, कृषी मंत्री धनंजय मुडे यांना भेटून आ. आशुतोष काळे यापूर्वीच पिक विमाबाबत भरपाईची मागणी केली होती.

हेही वाचा

Chandrasekhar Bawankule: ३५० रूपयांचा चहा मिळणाऱ्या हॉटेलमधून गरिबांच्या गोष्टी: चंद्रशेखर बावनकुळे

वडगाव शेरी : पादचारी रस्त्यावर; पथारीवाले पदपथावर! महापालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष

Pune News : साऊथ कोरियासाठी पुण्यातील मुलींनी गाठली थेट मुंबई

Back to top button