वडगाव शेरी : पादचारी रस्त्यावर; पथारीवाले पदपथावर! महापालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष | पुढारी

वडगाव शेरी : पादचारी रस्त्यावर; पथारीवाले पदपथावर! महापालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष

वडगाव शेरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा: खराडी, चंदननगर येथील अनेक पदपथ पथारी व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहेत. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पादचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पदपथ बांधले आहेत. परंतु, त्यावर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचार्‍यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागत आहे. नागरिक रस्त्यांवर अन् हातगाड्या पदपथावर, असे चित्र परिसरात दिसून येत आहे.
खराडी, चंदननगर परिसरात लाखो रुपये खर्च करून महापालिकेने पदपथ बांधले आहेत. या पदपथांवर पथारी व्यावसायिकांनी विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. यामुळे पदपथ नक्की कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  खराडी बायपास येथे पदपथावर अनेक पथारी व्यावसायिक बसत आहेत. तसेच, झेन्सार कंपनीसमोर असलेल्या पदपथही या व्यावसायिकांनी व्यापून टाकला आहे. रिलायन्स मार्टसमोरील पदपथ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी  गिळंकृत केला आहे. याकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पदपथांवर पथारी व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. दुकानांपुढे एका टपरीसाठी दरमहा सुमारे 15 ते 20 हजार रुपये मिळत आहेत. यामुळे परिसरात अनधिकृत टपर्‍यांची संख्या वाढली आहे. तसेच चायनीज, मिसळ आणि स्नॅक्स सेंटर, वडापाव, ज्यूस, अंडाभुर्जी, चहा, सॅन्डविच, पराठा आदी खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून दररोज सुमारे 500 रुपये घेतले जात आहेत. ठिकाणानुसार पैसे कमी जास्त केले जात आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आशीर्वादाने पदपथावर टपर्‍या थाटल्या जात असून, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
खराडी, चंदननगर भागामध्ये नियमित कारवाई केली जाते. परंतु पदपथावर पथारी व्यावसायिकांचे पुन्हा अतिक्रमण होत आहे. या भागामध्ये पुन्हा लवकरच कारवाईची मोहीम हाती घेतली जाईल.
– सुभाष तळेकर, अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभाग
अतिक्रमण कारवाई करण्यासाठी मुख्य खात्यांकडून ट्रक, तसेच पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर तातडीने कारवाई केली जाईल.
– कुणाल मुंडे, निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग
हेही वाचा

Back to top button