पारनेर : कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

पारनेर : कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील म्हसणे फाटा येथील एमआयडीसीमधील एका कंपनीच्या दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनी नापीक झाल्या आहेत. संबंधित कंपनीवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन मनसे तालुका उपाध्यक्ष रवीश रासकर यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना दिले. कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

निवेदनात म्हटले आहे की, म्हसणे फाटा सुपर फेज 2 एमआयडीसीमधील एक कंपनी दूषित पाणी बाहेर सोडत असल्यामुळे तेथील शेतकर्‍यांना व रहिवाशांना त्रास होतो. या दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दूषित पाणी परिसरातील तळ्याला जाऊन मिळते. त्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. तेथील शेतकर्‍यांना व रहिवाशांना त्रास होऊ नये, याची खबरदारी या कंपनीने घ्यावी. यावर जर या कंपनीने लवकरात लवकर उपाययोजना केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू. एमआयडीसी उपअभियंता संदीप बडगे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहमदनगर उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे यांना रवीश रासकर यांनी हे निवेदन दिले.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news