नगर जिल्ह्यातील 59 मंडलांत पावसाचा गुंगारा

नगर जिल्ह्यातील 59 मंडलांत पावसाचा गुंगारा
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सलग 21 दिवस पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडलांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या आता 59 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील 9 मंडलांचा समावेश आहे. या मंडलांतील विमाधारकांना विमा कंपनीकडून एकूण नुकसानभरपाईच्या 25 टक्के रक्कम आगाऊ मिळण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यात सलग चार वर्षे सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके जोरात होती. यंदा मात्र पावसाने दडी मारली.

त्यामुळे दुष्काळाचे सावट पसरले आहे. आठ दिवसांपूर्वी सलग 21 दिवस पावसाचा एकही थेंब पडला नसल्याचे 42 महसूल मंडल आढळून आले. त्यानंतर पुन्हा 17 महसूल मंडल आढळून आले आहेत. पावसाअभावी पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास संबंधित विमाधारकांना एकूण विमा नुकसानभरपाईची 25 टक्के आगाऊ मदत विमा कंपनीकडून मिळणार आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सर्वेक्षण करण्याचे निर्देश कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण अहवाल राज्याच्या कृषी विभागाकडे पाठविला जाणार आहे. कृषी विभागाच्या वतीने विमा कंपनीला अहवाल सादर केला जाणार आहे. उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली, अशा विमाधारकांना नुकसानभरपाईची 25 टक्के आगाऊ रक्कम मिळणे बंधनकारक आहे. विमा कंपनी कोणता निर्णय घेते याकडे 59 मंडलांतील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

पावसाचा खंड पडलेली मंडले
नगर : वाळकी, चास, रुईछत्तीशी. पारनेर : पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, टाकळी, पळशी. श्रीगोंदा : श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेडगाव, चिंभळा, देवदैठण. कर्जत : कर्जत, राशीन, कोंभळी, माही. जामखेड : अरणगाव, खर्डा. शेवगाव : शेवगाव, बोधेगाव एरंडगाव. पाथर्डी : पाथर्डी. नेवासा : नेवासा खुर्द, सलाबतपूर, कुकाणा, वडाळा. राहुरी : राहुरी सात्रळ, ताहाराबाद, टाकळीमियाँ, वांबोरी. संगमनेर : संगमनेर, आश्वी, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे. अकोले : वीरगाव, समशेरपूर. कोपरगाव : कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव. श्रीरामपूर : श्रीरामपूर, टाकळीभान. राहाता : राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news