अहमदनगर जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत वसले हरिहरेश्वराचे शिवमंदिर; श्रावणातील आज सर्वात मोठी यात्रा | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत वसले हरिहरेश्वराचे शिवमंदिर; श्रावणातील आज सर्वात मोठी यात्रा

रमेश जोशी

कोरडगाव(अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरापासून कोरडगावमार्गे 23 किमी अंतरावर पाथर्डी- शेवगाव सीमेवर असलेले तोंडोळी गाव. तोंडोळीपासून 1 ते 1.5 किमी अंतरावर निसर्गरम्य व डोंगराच्या कुशीत वसले हरिहरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर. डोंगराने वेढलेले, शांत व निसर्गरम्य परिसरातील हरिहरेश्वराने शिव मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावणातील दुसर्‍या सोमवारी मोठी यात्रा भरते. या मंदिराला हरिहरेश्वर कैलास गमन मंदिर नावाने ओळखले जाते.

लिंग शिव, विष्णूचे प्रतिनिधित्व

मंदिर पूर्वाभिमूखी असून, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप चार पूर्णस्तंभावर तोललेले आहे. या मंदिराचे गर्भगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा आकाराने मोठे आहे. गर्भगृहात चार पूर्णस्तंभ असून, शिवपिंडीच्या मागील बाजूस सरळ रेषेत आणखी तीन स्तंभ आहेत. शिवलिंगाच्या पीठावर दोन लिंग असून, ही दोन लिंगे भगवान शिव व भगवान विष्णूचे प्रतिनिधित्व करतात.

मंदिरावियषी थोडेसे..!

महंत गणपत महाराज वरुटे सांगतात की, अनेक वर्षांपूर्वी भस्मासुराला, भगवान शंकराने वर दिला, ज्याच्या डोक्यावर तु हात ठेवशील तो भस्म होईल. एकदा भस्मासूर भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांच्या मागे धावला. भगवान शंकर दंडकारण्यात पळाले, तेव्हा पार्वतीने सर्व देवांची व भगवान विष्णूची भेट घेऊन त्यांना हा वृत्तांत सांगितला. तेव्हा भगवान विष्णूने मोहिनी रुप धारण करून भस्मासुराचा वध केला. नंतर याच अरण्यात भगवान शंकर व विष्णूची भेट झाली. ते कैलासात गेले. तेच हे ठिकाण म्हणून येथे भगवान शंकर व विष्णूंची दोन लिंगे आहेत. पूर्वी या मंदिराच्या चारही दिशेला सप्तर्षी राहत होते. याचा स्पष्ट उल्लेख शिवलीलामृताच्या 12व्या अध्यायात आलेला आहे.

मंदिराजवळ गणेश मूर्ती

मंदिरा जवळ विहिर असून, समोर गणेश मूर्ती, मारुती मंदिर, दत्त मंदिर व काही नवीन बांधकाम आपल्याला दिसून येते. मदिरा समोर नंदी, भग्न शिल्पं, वीरगळ, सतीशीळा व विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती आहे. मंदिरा समोर एक तलाव असून, या तलावाचे बांधकामही मंदिरा इतकेच पुरातन असावे, असे तलावाच्या बांधकामावरून लक्ष्यात येते.

देवस्थान विकसित करण्याची गरज

मंदिर परिसरात नव्याने बांधलेल्या सभामंडपात चार फुटी पीठावर शिव छत्रपतींची सिंहासनारुढी प्रतिमा नव्याने स्थापन करण्यात आली आहे. डोंगराच्या कुशीत व निसर्गरम्य परिसरात असलेल्या या पुरातन शिवमंदिराला भेट दिल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती व समाधान मिळते एवढं मात्र नक्की. देवस्थानच्या सभोवताली वनविभागाची जमीन असून, या ठिकाणी वन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊन पर्यटन स्थळ म्हणून देवस्थान विकसित करण्याची गरज आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी कडून देवस्थानचा समावेश ‘क’ वर्ग दर्जा देवस्थान सूचीमध्ये करून भाविकांसाठी रस्ते तसेच देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

हेही वाचा

अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रशांत दरेकर

अजिंक्यपद स्पर्धा : अहमदनगरच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

अहमदनगर जिल्ह्यात जीईएम पोर्टलवरील खरेदीला ग्रामपंचायतींकडून हरताळ!

Back to top button