तीन सप्टेंबरपासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा | पुढारी

तीन सप्टेंबरपासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या वतीने ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरपर्यंत जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. ३ सप्टेंबर रोजी आष्टी येथे सकाळी ८ वाजता यात्रेचा प्रारंभ होईल. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित राहील. पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहोचतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. येथील सद्भावना भवनात पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेविषयी माहिती देण्यात आली. यावेळी नागपूर विभाग समन्वयक नाना गावंडे, जिल्हा प्रभारी झिया पटेल, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, प्रदेश सचिव अमर काळे, शेखर शेंडे आदींची उपस्थिती होती. जनसंवाद यात्रेतून जनतेच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.

भारत जोडोच्या धर्तीवर ही मिनी संवाद यात्रा असणार आहे. जनसंवाद पदयात्रेची राज्यातील सुरूवात आष्टी (श.) येथून तीन सप्टेंबर रोजी होईल. जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ही यात्रा पोहोचेल. केंद्र आणि राज्य सरकारपासून जनता त्रस्त आहे. यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. तीन ते बारा सप्टेंबरदरम्यान ही पदयात्रा नागपूर विभागात राहणार असून, अन्य विभागात पदयात्रेचे आयोजन आहे. आष्टीहून निघालेली यात्रा तळेगाव येथे विश्रांती घेत आर्वी येथे मुक्कामी राहील. आर्वी येथे सभा होईल. पुढे आर्वीच्या बोरगाव येथून गुंजखेडा, त्यानंतर पुलगाव ते देवळी, देवळी ते सालोड, सालोड ते वर्धा, वर्धा ते सेलू, सेलू – केळझर – सिंदी, वायगाव ते समुंद्रपूर, समद्रपूर – जाम – हिंगणघाट, वाघोली – तरोडा असे मार्गक्रमण असणार आहे. यादरम्यान सात सप्टेंबर रोजी विश्रांती राहील. १२ सप्टेंबर रोजी तरोडा येथून निघाल्यानंतर मदनी ते सेवाग्रामला समारोप होईल. यात्रेदरम्यान सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button