‘नवीन श्रीरामपूर’ची निर्मिती करणार : खा.डॉ. सुजय विखे पाटील

‘नवीन श्रीरामपूर’ची निर्मिती करणार : खा.डॉ. सुजय विखे पाटील

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण करुन राहणार्‍या तीन हजार लोकांना शेती महामंडळाची घरासाठी जागा देणार, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधणीसाठी मदत करणार तसेच पालिकेची नविन इमारत बांधण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देवून इमारतीसाठी जागाही देणार. भविष्यात श्रीरामपूरातील जनतेला कोणाला काही सांगायची गरज पडणार नाही. आपण नविन श्रीरामपूर निर्माण करणार असल्याचा निर्धार खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त संपन्न होणार्‍या कार्यक्रमास देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दि. 31 ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथे येत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे निमंत्रण आणि पुर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी श्रीरामपूर येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजीत बैठकीत खा. डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष दीपकराव पटारे, प्रकाश चित्ते, शहर अध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी, तालुका अध्यक्षा मंजुषा ढोकचौळे, वैशाली चव्हाण, नितीन कापसे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. विखे पाटील म्हणाले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेल्यावर्षी देशाचे गृहमंत्री अमित शहा आले. यावर्षी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे.

भारतीय जनता पार्टी हा पक्ष केवळ कागदावर मजबूत नसून फिल्डवर कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत आहे. या संघटनेबरोबर प्रशासकीय यंत्रणा व विखे यंत्रणा एकत्रीतपणे राबत असल्यामुळे 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविला. त्यामुळे या योजनेचे महत्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या योजनेचा खर्च एक कोटीवरुन तीन कोटीपर्यंत केला. हे आपल्या संघटनेचे श्रेय आहे.

शहरालगतच्या बेलापूर ते श्रीरामपूर व दत्तनगर ते श्रीरामपूर हे शिवरस्ते केले जातील. तसेच बायपास रस्ता निर्माण करुन श्रीरामपूर शहरातील गुंडगिरी, अतीक्रमीत शहर असलेली ओळख पुसणार आहे. तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण हद्दीमध्ये राहणार्‍या नागरीकांना स्वत:च्या मालकीचे प्रॉपर्टी कार्ड देणार असून सदर जागा त्यांच्या नावावर करणार असल्याचे खा. विखे म्हणाले.
प्रारंभी प्रास्तावीक तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांनी केले.

लोकसभेला मोदींचा फोटो लावेल तो आपला उमेदवार

भविष्यात येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत बरीच चर्चा झडत आहे. परंतु देशाला आत्मनिर्भर भारत बनवून प्रगतीपथावर घेवून जाणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो जो लावेल, तो आपला उमेदवार म्हणून निवडुन द्या, अशा वेळी तो आला नाही, दिसला नाही. या गोष्टी विसरा, असे आवाहन खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

कांदा प्रश्नी सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी

कांदा नाफेड मार्फत 2410 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आजपर्यंत येथे अनेक मंत्री होवून गेले. त्यांनी कधीही या दराने कांदा खरेदी केलेला नाही. केवळ विरोध करायचा म्हणून करतात. त्यांना संघटनेच्या माध्यमातून चोख उत्तर द्या. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचा खुलासा खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news