

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस बळ अपुरे असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलिस ठाण्यात रिक्त असलेली एकूण 25 पदे भरण्यासाठी आपण यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. यामध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालून ही रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्याकडे केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक ओला हे शांतता समितीच्या बैठकीसाठी आले असता, माजी आमदार कोल्हे यांनी त्यांच्याकडे ही मागणी केली. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले उपस्थित होते.
कोल्हे म्हणाल्या, यापूर्वी शहर आणि तालुक्यासाठी एकच पोलिस ठाणे कार्यरत होते. 79 गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण अशा दोन स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत शहर पोलिस ठाण्यात 3 पोलिस अधिकारी, 41 कर्मचारी कार्यरत असून, 11 कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात 2 अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी एका अधिकार्याची बदली झाली आहे, तर 39 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.
ग्रामीण पोलिस ठाण्यात 1 सहाय्यक पोलिस निरीक्षक व 2 पोलिस उपनिरीक्षक अशा 3 पोलिस अधिकार्यांची व 14 कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये एकूण 25 पदे रिक्त आहेत. कोपरगाव हे नगर-मनमाड महामार्गावर वसलेले आहे. शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांत चोर्या, घरफोड्या व इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटकाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात पुरेशी कुमक असणे अत्यावश्यक आहे.
शहर व तालुक्यातील जनता शांतताप्रिय आहे. यापूर्वी कधीही सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण दूषित झालेले नाही; पण अलीकडे काही घटक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन तालुक्यात सामाजिक एकता व बंधुभाव अबाधित ठेवण्याचे काम केले. सामाजिक ऐक्य व शांतता टिकवून ठेवण्यातच आपल्या सर्वांचे हित आहे. प्रत्येकाने आपला धर्म जपावा मात्र त्यातून शांतता देखील जपावी. असे आवाहन माजी आ. कोल्हे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
हेही वाचा