अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक मार्गावरील पहिल्या टप्प्यातील नगर शहरातील प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी राज्य सरकारकडून 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत हा निधी मिळाला असून, उर्वरित मिरवणूक मार्गावरील दुसर्या टप्प्याचे काम लवकरच मंजूर होईल, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने मोठा निधी प्राप्त होत आहे. त्यानुसार कायमस्वरूपी व नियोजनबद्ध विकासाची कामे सुरू आहेत. या माध्यमातून नगर शहराचा शाश्वत विकास हाच अजेंडा आम्ही राबवित आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय, जिल्ह्याचे माळीवाडा बसस्थानक आहे. जिल्हाभरातील विद्यार्थी, महिला, नागरिक आपल्या विविध कामांसाठी नगर शहरात येत असतात.
हा रस्ता शहरातील रहदारीचा मुख्य रस्ता आहे. नागरिकांची येथे दिवसरात्र वर्दळ असते. पण हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन रस्ता काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रस्त्याचा कायमस्वरुपीचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. यापूर्वी स्वस्तिक चौक ते आयुर्वेद कॉर्नर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेशीपर्यंत व आनंदऋषिजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून ते स्वस्तिक चौकापर्यंतची रस्ता काँक्रिटीकरणाची कामे मार्गी लागली आहेत. टप्प्याटप्प्याने शहरातील प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
हेही वाचा