कोल्हापूर : चिपरीत तृतीयपंथीयाचा दगडाने ठेचून खून | पुढारी

कोल्हापूर : चिपरीत तृतीयपंथीयाचा दगडाने ठेचून खून

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : चिपरी (ता. शिरोळ) येथील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील इचलकरंजी फाट्याजवळ गुरुवारी रात्री तृतीयपंथीय संतोष रामदास जावीर (वय 34, रा. शिंदे मळा, खोतवाडी इचलकरंजी) याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. दरम्यान, ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे इचलकरंजी, चिपरी, जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे. खुनाचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष रामदास जावीर हा तृतीयपंथी असून तो गुरुवारी रात्री

इचलकरंजी फाट्याजवळ आडोशाला थांबला होता. याचवेळी त्याच्या डोक्यात अज्ञातांनी दगड घालून खून केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर ही माहिती जयसिंगपूर ठाण्याला कळविण्यात आली. पोलिस उपाधिक्षक डॉ. रोहिणी सोळुंके, पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेेत पंचनामा केला.

अज्ञाताने संतोषच्या डोक्यात दगड घातल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूरचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसराची सखोल माहिती घेण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये रात्री उशिरा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला. या घटनेची नोंद रात्री उशिरा जयसिंगपूर पोलिसांत झाली. घटनास्थळी तृतीयपंथीयांनी गर्दी केली होती.

Back to top button