

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातून वाहत असलेल्या सीना नदीला येणार्या पुरामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी, नदीतील पूरनियंत्रण उपाययोजना करून नदीतील गाळ काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सीना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
तसेच, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्षात सीना नदीची पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा अंतर्गत यांत्रिक विभागाला अभियंते, मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरविण्याचे आदेश दिले. त्यास जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी मंजुरी दिली. सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्यावर पूर नियंत्रण रेषा स्थलांतरित करण्यासही त्यांनी मान्यता दिली. जिल्हा नियोजन समितीने इंधन पुरविण्याचे काम करावे, हे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ऑनलाईन व्हिसीद्वारे उपस्थित राहून मान्य केले.
सीना नदीतून काढलेला गाळ पुन्हा नदीत वाहून जाऊ नये, यासाठी म्हणून त्याची स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर सीना नदीला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होईल. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर सीना नदीची हद्द निश्चिती होऊन पूर नियत्रण रेषा स्थलांतरित होणार आहे.
या बैठकीला नियोजन विभागाचे मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, नगर शहरात सीनानदीचे पात्र सुमारे 13 किलोमीटरचे असून, यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसामुळे येणारे पुराचे पाणी नगर शहरातील काही भागांमध्ये नागरिकाच्या घरात, दुकानात शिरते. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी नदीतील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी ही समस्या लक्षात घेऊन तातडीने बैठकीचे आयोजन करत ही समस्या मार्गी लावली. आता सीना नदीचे सुशोभिकरण झाल्यावर पावसामुळे येणार्या पुराचा प्रश्न मार्गी लागेल. याचबरोबर पूर नियंत्रण रेषा स्थलांतरित होणार असल्याने नागरिकांचा प्रश्न मार्गी लागेल. शहरवासियांसाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल.
हेही वाचा