

बीजिंगः पावसाळ्यात डोंगरदर्यांवर इंद्रधनुष्य द़ृष्टीस पडते. मात्र, संपूर्ण डोंगरच इंद्रधनुष्याच्या रंगीबेरंगी ढंगात न्हाऊन निघत असेल तर नवलच. मात्र, संपूर्ण डोंगरच इंद्रधनुष्याच्या रंगीबेरंगी ढंगात न्हाऊन निघत असेल तर नवलच. चीनच्या डेनक्सिया लँडफॉर्म जिऑग्राफिकल पार्कमध्ये असे रहस्यमयी डोंगर आहेत.
विविध रंगांच्या वाळू आणि खनिजांनी बनलेले हे डोंगर लाखो वर्षांपासून सौंदर्याची भुरळ पाडत आहेत. सोबतचे छायाचित्र पाहून कदाचित कोणाला विश्वास बसणार नाही किंवा डोंगराला रंग दिल्याचे असेही वाटेल. युनेस्कोच्या जागतिक वारशात 6 वर्षांपूर्वी या डोंगराचा आपल्या यादीत समावेश केला आहे.
हा भाग चीनच्या उत्तरेकडील किलियन पर्वतरांगेत येतो. लिंजे आणि सुनन भागही याच सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या परिसरात पसरला आहे. चीनच्या पुरातत्त्ववाद्यांनी 1920 मध्ये हा भाग शोधून काढला. या भागात अशा प्रकारचे सौंदर्य वसले असल्याचे यापूर्वी स्थानिकांना माहीतच नव्हते. सर्वप्रथम हा भाग सोंग वंश (960-1279) यांच्या राज्यात होता. डेनक्सिया राष्ट्रीय उद्यानाला लिंजे डेनक्सिया सिनिक एरिया असेही म्हटले जाते. झांगे शहरापासून 20 कि.मी. अंतरावरील लिंजे काउंडी भागात हा मोडतो. अनेक पर्यटकांना हे रंगीत डोंगर पाहण्याची उत्सुकता असते. त्यामुळे हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळही बनले आहे.