

नगर : कांद्याचे भाव गडगडले. टोमॅटोचीही लाली कमी झाली. कांदा अनुदान अजूनही कागदावरच आहे. गेल्या वर्षीची अतिवृष्टीग्रस्तांची मदतही वाटेतच आहे. नैसर्गिक संकट आणि सरकारच्या सुलतानी धोरणामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्याने अशाही परिस्थितीत खरिपासाठी ऊसनवारी करत, सावकारांकडून पैसे काढत सुमारे 100 कोटींचे बियाणे मातीत गाडले. त्यावर तब्बल 15 कोटींची खते टाकण्याचे धाडसही दाखविले… पण दुर्दैवाने वरुणराजाने पाठ फिरविली. गेल्या 48 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा डोळ्यात प्राण आणून पावसाची आणि शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत आहे.
यंदा खरिपसाठी जिल्ह्यात सुमारे 6 लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. त्यासाठी कृषी विभागाने आवश्यक ते बियाणे उपलब्ध केले होते. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी केंद्रांवर वॉच ठेवला. त्यामुळे शेतकर्यांना निर्धारित दरात खते आणि बियाणे उपलब्ध झाले.
मशागत, पेरणी, खुरपणी, फवारणीवर मोठा खर्च!
शेतकर्यांनी पावसाच्या भरवशावर जूनमध्येच सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका पेरणी केली. कपाशी लागवडीखालीही मोठे क्षेत्र दिसले. परंतु आज खरीप हंगाम सुरू होऊन तीन महिने होत आले, तरीही अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. शेतकर्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी, लागवडी केल्या, खतांचे डोस दिले, फवारणी केली. खुरपणी केली; परंतु पाऊसच नसल्याने पिकांनी माना टाकल्या. त्यामुळे झालेला खर्च तरी निघेल का, असा प्रश्न आहे.
सोयाबीन, कपाशीची वाढ खुंटली!
पाऊस नसल्याने सोयाबीनची वाढ नाही. त्यामुळे उत्पादनात मोठा फटका बसणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दीड ते दोन कपाशी फूट उंच वाढली होती. मात्र आज काही सेंटीमीटरमध्ये ती दिसत आहे. फुले नाही, कळ्या नाहीत. त्यामुळे झालेला खर्च फिटणे मुश्कील आहे. बाजरीची अवस्थाही वाईट आहे. कपाशी गुडघ्याच्या खाली आहेत. त्यामुळे पाऊस झाला तरी उत्पादनात वाढ होणार नाही, अशीच शेतकर्यांची भावना आहे.
साक्षात्कार 42 मंडलांचाच
जिल्ह्यात कोठेही पाऊस नाही. कालची रिमझीम काही भागातच आहे. असे असतानाही प्रशासनालाही केवळ 42 मंडलांतच पाऊस नसल्याने पिके संकटात असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे उर्वरित मंडलातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात अनेक भागांत खरोखरच पाऊस नसल्याने पिके संकटात दिसली. अशा वेळी उपलब्ध पाण्यातून वेगवेगळ्या सिंचन पद्धतीतून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून पिके तग धरू शकतील.
– नीलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषदआमच्या पिकाचा एखाद्यावेळी भाव वाढला, तर शहरी बाबू लगेच बोंबलतात आणि त्यांचा आवाज शासनापर्यंत तत्काळ पोहचतोही; मात्र आम्ही वर्षानुवर्षे मातीशी झुंजतो आणि दुर्दैवाने आमच्याकडे आजपर्यंत शासनाचे लक्ष गेलेले नाही.
– विलास ढोकणे, शेतकरी, उंबरे
हेही वाचा :