शेवगाव-पाथर्डीत नवीन योजनेद्वारे पाणी : आमदार मोनिका राजळे | पुढारी

शेवगाव-पाथर्डीत नवीन योजनेद्वारे पाणी : आमदार मोनिका राजळे

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव व पाथर्डी नगरपालिका क्षेत्रात नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे लवकरच पाणी मिळणार आहे. मतांच्या बेरीज-वजाबाकीचा विचार न करता नागरिकांच्या अडचणीचे निवारण करणे हेच ध्येय ठेवून आपण विकास करीत असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. शेवगाव नगरपालिका हद्दीत राज्यस्तरीय नागरी सुविधा व जिल्हा नियोजन अंतर्गत विविध प्रभागांत 5 कोटी 60 लाख रूपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अरूण लांडे, भाजपा अध्यक्ष ताराचंद लोढे, आशा गरड, रवींद्र सुरवसे, डॉ. निरज लांडे, विजयराव देशमुख, सतीश लांडे, आशुतोष डहाळे, किरण पवार, उमेश लांडे, सुनील रासणे, नगरसेवक महेश फलके, सागर फडके, अशोक आहुजा, गणेश कोरडे आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, रस्ता, वीज, पाणी या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. मतदारसंघाचे नेतृत्व करताना काही कालावधी सोडता शासनाकडून मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कामांसाठी निधी आणता आला. केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवनचे काम, तसेच पाणी योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. मतदारसंघातील दोन्ही नगरपालिका क्षेत्रात लवकरच नवीन पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणी मिळणार आहे. मतदारसंघातील बहुतांशी मुख्य रस्त्यांची कामे झाली असून काही प्रगतिपथावर आहेत. ग्रामीण भागातील प्लॅनवरील व नॉन प्लॅन रस्त्यांसाठीही मोठा निधी उपलब्ध केला आहे. उर्वरित कामांसाठी प्रयत्नशील आहोत. शासनाच्या माध्यमातून निधी आणत असताना संबंधित कार्यान्वित यंत्रणा, ठेकेदार यांनी कामांची गुणवत्ता ठेवणे अपेक्षित आहे. कामाची गुणवत्ता न राखणार्‍या कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे आमदार राजळे यांनी यावेळी ठणकावून सांंगितले.

दुर्लक्षित वस्तीचा विकास : लांडे
राजकीय नेतेमंडळी आश्वासने देऊन मत मागतात. मात्र, आमदार मोनिका राजळे या अगोदर काम घेऊन आल्या आहेत आणि येणार्‍या निवडणुकीत मत मागणार आहेत. शहरालगत आमची मोठी वस्ती विकासापासून कायम दुर्लक्षित राहिली होती. आता तिचा विकास होत असल्याचे राम लांडे म्हणाले.

हेही वाचा :

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, गोपनीय अहवाल लीक प्रकरणी कोर्टाने बंद केला खटला

नगर : पिंपळगाव तलावातून अवैध पाणी उपसा !

Back to top button