अहमदनगर : मंदिरात चोरी करणारी टोळी एलसीबीकडून गजाआड | पुढारी

अहमदनगर : मंदिरात चोरी करणारी टोळी एलसीबीकडून गजाआड

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर रस्त्यावरील तुक्कडओढा येथून मंदिर फोडून सोने-चांदी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. त्यांनी सहा गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. धनंजय प्रकाश काळे (वय 25, रा.संवत्सर,कोपरगाव), भगवान दिलीप परदेशी (वय 38, रा. शिर्डी, ता. राहाता) अमोल लक्ष्मण पारे (वय 30, रा.कोपरगाव), राहुल केसरसिंग लोदवाल (वय 32, रा. बेलापूर) अशी अटकेतील चौघा आरोपींची नावे आहेत.

अमरापूर (ता. शेवगाव) येथील रेणुकामाता मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या अंगावरील 16 लाख 76 हजार 400 रुपयांची दागिने चोरीला गेले. पुजारी तुषार विजय वैद्य यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात यासंदर्भातील गुन्हा दाखल होताच आरोपींच्या शोधाकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पेट्रोलिंग करीत असताना पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींची माहिती मिळाली. मंदिरातील दागिने चोरीचा गुन्हा धनंजय काळे(रा. संवत्सर ता. कोपरगाव) याने केला असून, तो नगर-सोलापूर रस्त्यावरील तुक्कडओढा येथील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ थांबला आहे.

पोलिसांनी नगर-सोलापूर रस्त्यावर सापळा लावून धनंजय काळे, भगवान परदेशी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी अमोल पारे, राहुल लोदवाल यांच्या साथीने मंदिरात चोरी केल्याचा गुन्हा कबुल केला. गुन्ह्यातील 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपींना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, विजय वेठेकर, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संदीप चव्हाण, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, भरत बुधवंत, अरुण मोरे यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपी धनंजय काळे यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. अमोल पारे यांच्याविरुद्ध 14 तर अन्य दोन आरोपीविरुद्ध प्रत्येकी चार गुन्हे दाखल आहेत.

उघडकीस गुन्हे असे

राम मंदिर तांभेरे, कानिफनाथ मंदिर (ता. राहुरी), भैरवनाथ मंदिर उंबरगाव(ता. श्रीरामपूर), महेश्वरी मंदिर कोळपेवाडी, रेणुकादेवी माहेगाव, शनेश्वर मंदिर तळेगाव (ता. कोपरगाव), शनी मंदिर भोकरदन(ता.जालना) येथील मंदिरातील दानपेटी व सोने-चांदी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, अमरापूर येथील मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याची आरोपींनी कबुली अद्याप तरी दिलेली नाही.

हेही वाचा

अहमदनगरमध्ये दूध भेसळ रोखणारी समिती कागदावरच!

मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते : विजयकुमार गावित

अमोल बळे हत्याकांड : ऑनर किलिंग गुन्ह्यातील चौघांना जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Back to top button