अमोल बळे हत्याकांड : ऑनर किलिंग गुन्ह्यातील चौघांना जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल | पुढारी

अमोल बळे हत्याकांड : ऑनर किलिंग गुन्ह्यातील चौघांना जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अमोल सखाराम बळे याच्या हत्येतील चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. ऑनर किलिंग प्रकरणातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. आरोपींच्या दंडाची रक्कम मयत अमोलच्या आई-वडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बारालिया यांच्या न्यायालयाने दिला.

रुपचंद बन्सी बळे, ऋषिकेश विष्णू बळे (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा), दत्तात्रय लक्ष्मण बळे, अनिल रघुनाथ बळे (रा. निमगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. मयूर रावसाहेब लकारे (रा. नेवासा, ता. नेवासा) व उषा रुपचंद बळे (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केले.

अमोल सखाराम बळे याला आरोपींनी सिद्धार्थनगर जवळ बोलावून घेतले होते व तेथून त्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले होते. नगर-दौंड रस्त्यावरील एका धाब्याजवळ अमोलला नेऊन मुलीला फूस लावल्याचा आरोप करत मारहाण केली होती. त्यानंतर आरोपींनी जखमी अमोलला दिल्ली गेट परिसरात सोडून दिले होते.

अमोलच्या एका मित्राने रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. मात्र, मार जास्त लागल्याने अमोलची तब्येत अधिक चिंताजनक झाली. औरंगाबादमधील रुग्णालयात उपचारा दरम्यान 6 जून 2018 रोजी अमोलचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भाऊसाहेब बळे याने औरंगाबाद येथील क्रांती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर हा गुन्हा तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक विशाल सनस यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. न्यायालयाने रुपचंद बळे याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व 50 हजार दंड, दत्तात्रेय बळे, ऋषिकेश बळे व अनिल बळे यांना जन्मठेप व 40 हजार दंड तसेच अपहरणाच्या गुन्ह्यात चारही आरोपींना सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी पोलिस हवालदार कृष्णा पारखे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा

भीमाशंकर मंदिर, गाभार्‍यात फुलांची आकर्षक सजावट

निरा देवघर धरणातून निरा नदीत 1340 क्युसेकने विसर्ग

लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी आग्रही : जयंत पाटील

Back to top button