अहमदनगरमध्ये दूध भेसळ रोखणारी समिती कागदावरच! | पुढारी

अहमदनगरमध्ये दूध भेसळ रोखणारी समिती कागदावरच!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील समित्यांना दूध भेसळ रोखण्यासाठी धडक कारवाईच्या सक्त सूचना केल्या असल्या तरी नगरमध्ये मात्र संबंधित जिल्हास्तरीय दुग्ध तपासणी समिती अजूनही अ‍ॅक्शन मोडवर आलेली दिसत नाही. पारनेरची कारवाई सोडली, तर महिना उलटल्यानंतरही समिती फक्त कागदावरच अ‍ॅक्टिव्ह असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात दररोज 42 लाख लिटर दूधाचे उत्पादन होते. छोट्या-मोठ्या दूध संकलन केंद्रातून हे दूध जमा केले जाते. यात सहकारी 12 दूध संघातून साधारणतः सात लाख लिटर दूध मिळते, तर उर्वरीत खासगी दूध संघ, संकलन केंद्रातून तब्बल 35 लाख लिटर दूध दररोज संकलित केले जाते. हे दूध मुंबई, बारामती, गुजरात या ठिकाणी पाठविले जाते. जिल्ह्यात भेसळयुक्त दूधाची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे लपून राहिलेले नाही. दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दूध भेसळीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

त्यांच्या सुचनांनुसारच, दूधात होणार्‍या भेसळीचा पायबंद घालण्यासाठी जून 2023 मध्ये जिल्हास्तरीय समिती गठित केली होती. अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी समितीचे अध्यक्ष तर सदस्य म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैेरे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त कुटे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, वैध मापनचे उपनिबंधक नितीन उदमले आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. वसंत गारुडकर यांचा समावेश आहे.

अन्न व औषध विभागातून टोलवाटोलवी

जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांची नोंदणी ही अन्न व औषध प्रशासनाकडे असताना जिल्ह्यात किती संकलन केंद्र आहेत, याची माहिती सहायक आयुक्त काकडे यांना विचारली असता, त्यांनी दुग्ध व्यवसाय विकास अधिकार्‍यांकडे बोट दाखविले. तर दुग्ध विकास विभागाशी संपर्क केला असता, त्यांनी अन्न व औषध विभागाचे नाव सांगितले. विशेष म्हणजे हे दोन्ही विभाग भेसळ रोखणार्‍या समितीत असताना त्यांना जिल्ह्यात किती संकलन केंद्र आहेत, याची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संकलनांची माहिती वेबसाईटवर कधी?

प्रत्येक दूध केंद्राचे पशुपालक व त्यांनी संकलित केलेले दूध याबाबत माहिती दररोज वेबसाईटवर टाकण्यासाठी शासनाला समितीकडून पत्रव्यवहार करण्यात येणार होता, मात्र त्याचेही पुढे काय झाले, ते समजू शकले नाही.

भेसळ करणारे व स्वीकारणारेही आरोपी!

समितीने धडक कारवाया करून दूध भेसळ करणार्‍या व्यक्तीबरोबर भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणार्‍या व्यक्तींनाही सहआरोपी करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

महिना उलटला तरीही समितीची विश्रांती!

समितीने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोळगाव, राहुरी (ब्राम्हणी परिसर), जोगेश्वरी आखाडा येथील दूध संकलन केंद्रावर जावून तपासणी केली, तर पारनेरमध्ये 2200 लिटर दूध नष्ट केले. त्यानंतर महिना उलटला तरी कुठेही समितीने कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. आजही अनेक भागात भेसळ सुरू असून, शासन समितीच्या भोकाडीला भेसळखोर घाबरत नसल्याचे चित्र आहे.

पारनेरच्या कारवाईचे पुढे काय झालं?

पारनेर तालुक्यातील एका संकलन केंद्रावर जिल्हास्तरीय दुग्ध तपासणी समितीने भेसळीच्या संशयातून 2200 लिटर दूध नष्ट केल्याचे पुढे आले होते. या कारवाईबाबत कमालीची गोपनियता पाळली होती. मात्र पुढे काय झाले, याची माहिती समजू शकली नाही.

हेही वाचा

अमोल बळे हत्याकांड : ऑनर किलिंग गुन्ह्यातील चौघांना जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

थेट पाईपलाईन पाणीपुरवठ्याला 25 सप्टेंबरचा मुहूर्त : आ. सतेज पाटील

भीमाशंकर मंदिर, गाभार्‍यात फुलांची आकर्षक सजावट

Back to top button