Talathi Exam : तलाठी परीक्षेच्या सर्व्हरमध्ये बिघाड; परीक्षार्थीना मनस्ताप | पुढारी

Talathi Exam : तलाठी परीक्षेच्या सर्व्हरमध्ये बिघाड; परीक्षार्थीना मनस्ताप

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात तलाठी पदाच्या 254 रिक्त जागांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत. सोमवारी परीक्षेच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याचा फटका परीक्षार्थींना बसला. दोन तास पेपर लांबणीवर पडल्यामुळे दीड हजारांवर परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला. महसूल विभागातील तलाठी पदाच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार 4 हजार 644 जागांसाठी 17 ऑगस्टपासून ऑनलाईन परीक्षा सुरु झाली आहे. जिल्ह्यात सात परीक्षा केंद्र आहेत. यामध्ये नगर शहरातील 3, श्रीगोंदा तालुक्यातील दोन, कोपरगाव तालुक्यातील 1 व अकोले तालुक्यातील 1 केंद्राचा समावेश आहे. या सर्व परीक्षा केंद्रांवर तीन सत्रात दररोज जवळपास दीड हजार युवक ऑनलाईन परीक्षा देत आहेत.

सोमवारी 9 वाजता पहिल्या सत्रात परीक्षा सुरु होताच टीसीएस कंपनीचे सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पहिल्या सत्रातील होणारी ऑनलाईन परीक्षा होऊ शकली नाही. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे जिल्ह्यातील सातही केंद्रांवर परीक्षार्थींची तारांबळ उडाली.
सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे पहिल्या सत्राचा पेपर तब्बल दोन तासांनंतर 11 वाजता सुरु झाला. 12 वाजता सुरु होणारा दुसर्‍या सत्राचा पेपर 2 वाजता तर 4 वाजता सुरु होणार्‍या तिसर्‍या सत्राची परीक्षा 5.30 वाजता सुरु झाली.

राज्यभरातील 115 केंद्रांवर तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षेची व्यवस्था केली आहे. परीक्षा घेण्याचा ठेका टीसीएस कंपनीला दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
याची महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत सर्व्हर बिघाडाची चौकशी केली जाणार आहे. आगामी काळातील परीक्षा वेळापत्रकानुसार सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभागाला दक्ष राहाण्याचे निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा

अहमदनगरमध्ये दूध भेसळ रोखणारी समिती कागदावरच!

भीमाशंकर मंदिर, गाभार्‍यात फुलांची आकर्षक सजावट

अमोल बळे हत्याकांड : ऑनर किलिंग गुन्ह्यातील चौघांना जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Back to top button