थेट पाईपलाईन पाणीपुरवठ्याला 25 सप्टेंबरचा मुहूर्त : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेल्या थेट पाईपलाईन योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. पाईपलाईनसह सर्व चाचण्या पूर्ण होऊन सप्टेंबरमध्ये काळम्मावाडी धरणातून पाणी कोल्हापुरात येईल. 25 सप्टेंबरपासून कोल्हापूरकरांना योजनेतून नियमित पाणीपुरवठा होईल, अशी माहिती आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे थेट पाईपलाईन योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
आ. पाटील यांनी महापालिका अधिकारी व ठेकेदार कंपनीकडून थेट पाईपलाईन योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 53 कि.मी. पाईपलाईन असून त्यापैकी 34 कि.मी.ची चाचणी यशस्वी झाली आहे. 19 कि.मी. पाईपलाईनची चाचणी घेण्यात येत आहे. अर्जुनवाडा येथे व्हॉल्व्हमधून पाणी आल्याने सर्व व्हॉल्व्ह तपासावेत, अशी सूचना महापालिका अधिकार्यांना दिली आहे. स्काडा यंत्रणाही पूर्ण करण्यात आली आहे. योजनेसाठी बिद्री ते काळम्मावाडी धरणापर्यंत विद्युत वाहिन्या टाकण्यात येत असून त्याचेही काम पूर्ण झाले आहे.
पुईखडीचे जल शुद्धीकरण केंद्र तयार
काळम्मावाडी धरण क्षेत्रातील दोन्ही जॅकवेल पूर्ण झाली आहेत. पंपहाऊसचे कामही मार्गी लागले आहे. आता चाचणी सुरू आहे. पुईखडी येथे 80 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधून तयार आहे. त्याच्या बाजूलाच जुने 40 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील इतर फिल्टर हाऊसला आणि संप हाऊसला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून पाण्याच्या टाक्यात पाणी जाऊन नागरिकांना घरापर्यंत पाणी वितरण होणार आहे.
अमृतचे काम पूर्ण होईपर्यंत जास्त पाणी नाही
कोल्हापूर शहरात 115 कोटीतून अमृत योजनेचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत शहरात पाण्याच्या 12 टाक्या बांधल्या जात आहेत. 400 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. परंतु योजनेचे पूर्ण झालेले नाही. त्यामुळे थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात आले तरीही जुन्याच पाईपलाईनमधून पाणी पुरवठा होणार आहे. परिणामी जोपर्यंत अमृत योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने आणि जास्त वेळ पाणी पुरवठा करता येणार नाही. त्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीबरोबर चर्चा केली आहे. त्यांनी दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, असेही आ. पाटील यांनी सांगितले.