

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : महिलांना पाहून लघुशंकेसाठी बसल्याच्या कारणावरुन चालकास गजाने मारहाण करून नवा कोरा हायवा पेटवून देण्याची घटना तालुक्यातील रुईगव्हाण शिवारात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात मिरजगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी गौतम कुमार उपेंद्र महातो (वय 23, राह बिहार) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटला आहे की, श्रीगोंदा-जामखेड रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शनमार्फत केले जात आहे. या कंपनीकडे मजूर म्हणून आम्ही काम करतो.
काल दुपारी बारा वाजता आम्ही सर्वजण हायवा गाडी ( 24 एयू 770) मध्ये बसून रुईगव्हाण गावाजवळून आढळगावकडे जात होतो. रुईगव्हाणच्या शिवारातील रघुनंदन मंगल कार्यालयाजवळ गाडीमधील मजूर लघुशंकेसाठी थांबले होते.या ठिकाणी परशुराम चंदर ठोकळे, साईनाथ जालिंदर ठोकळे व प्रणव सतीश आल्हाट (सर्व रा रुईगव्हाण) आले. त्यांनी एका मजुराला शिवीगाळ करीत तू आमच्या महिलांकडे पाहून लघशंकेसाठी बसला, असे म्हणत गजाने बेदम मारहाण केली.
यानंतर साईनाथ जालिंदर ठोकळे यांनी पेट्रोल आणून गौतम कुमार महातो व इतर तिघांना हायवा गाडीसह पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यावेळी गाडीतील सर्वांनी उडी टाकून प्राण वाचवले. मात्र, पेट्रोल टाकल्यानंतर काही मिनिटांतच हयवाने पेट घेतला. कोणाला काही समजण्याच्या आत ही घटना घडली. यानंतर घटनास्थळाकडे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. जखमींना मिरजगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
हेही वाचा