अहमदनगर : गोंधळ, गदारोळ अन् धावाधाव ! गुरुजींचे तब्बल ६ तास चर्चेचे गुर्‍हाळ | पुढारी

अहमदनगर : गोंधळ, गदारोळ अन् धावाधाव ! गुरुजींचे तब्बल ६ तास चर्चेचे गुर्‍हाळ

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गोंधळ, गदारोळ आणि एकमेकांवर धावधाव अशा वातावरणात शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा झाली. विकास मंडळाकडे 20 हजारांची रक्कम कायम ठेवीतून वर्ग करण्यास विरोधकांच्या समन्वय समितीने तीव्र विरोध दर्शविला. सहा तास गुरुजींनी या एकाच विषयावर काथ्याकूट केला. डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून सभासदांची मते जाणून घ्यायची. त्यानंतर दोन महिन्यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावून त्यात या विषयावर चर्चा करण्यावर एकमत झाले.
शिक्षक बँक आणि विकास मंडळाची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. विकास मंडळाच्या जागेवर हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रत्येक सभासदाच्या ठेवीतून 20 हजार रुपये वर्ग करण्याच्या विषयाला वाढता विरोध होता. याच पार्श्वभूमीवर सभा सुरू होण्यापूर्वीच समन्वय समितीने बैठक  घेवून त्यात गुरुकुलचे डॉ. संजय कळमकर, रोहोकले गटाचे प्रवीण ठुबे, अविनाश निंभोरे, संजय धामणे, इब्टाचे एकनाथ व्यवहारे आदींनी सभा शांततेत पार पाडण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करतानाच ‘त्या’ ठरावाला विरोध करण्याची व्यूहरचना आखली होती.
त्यामुळे सभेच्या ठिकाणी विरोधकांनी हातात निषेधाचे फलके घेवून व घोषणाबाजीतून एन्ट्री मारत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सभास्थळी दीप प्रज्वलन करताना छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर, महात्मा फुलेंच्या प्रतिमा नसल्याने विरोधक आक्रमक झाल्याचे दिसले. प्रस्ताविकात चेअरमन संदीप मोटे यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना अभ्यासपूर्ण मांडणी केली.
शरद वांढेकर यांनी 20 वर्षाच्या काळात सर्वात चांगला कारभार सत्ताधार्‍यांनी केला आहे. 10 वर्षापूर्वी बँक बुडेल की काय अशी भिती होती. सत्ताधार्‍यांचा कारभार पाहता हा विषय मंजूर करावा, अशी मागणी करताच मंजूर मंजूर मंजूरची खालून घोषणाबाजी झाली.
यावेळी बाळू खिलारी यांनी ठेवी वर्ग करण्यास विरोध दर्शविला. मंगेश खिलारी यांनी बँकेचे मालक हे सभासद असून, त्यांचा निर्णय मान्य करण्याची मागणी केली. राजेंद्र ठोकळ कायम ठेवीला हात लावू नये, असे मत मांडले.
विनोद देशमुख यांनीही ठेवी कपातीला विरोध दर्शविला. योगेश देशमुख यांनी बापूंची संकल्पना चांग़ली आहे मात्र सभासदांचा विचार ऐकूनच निर्णय घेण्याची मागणी केली. आबासाहेब दळवी यांनी ठेवीला बँकेप्रमाणे व्याज मिळाले तर हरकत काय, असे सुचविले. प्रकाश दळवी यांनी ठरावाच्या बाजुने मत मांडले. महिला सभासद नेहे यांनी विरोधाला विरोध न करता सकारात्मक विचार व्हावा, अशी भुमिका मांडली. विद्युलता आढाव यांनी मी स्वतः हॉस्पिटलच्या कामासाठी सर्व ठेव देण्यासाठी तयार असल्याचे जाहीर केले.
विजय नरोडे यांनीही बांधकामाच्या ब्लू प्रिंट संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले. शिवाजी ढाकणे यांनी हा विषय नामंजूर करावा, अशी मागणी केली. संभाजी औटी यांनी सभासदांचा एक रुपयाही न घेता डिपॉझीटमधून इमारत बांधावी, असा सल्ला दिला. गोर्वधन ठुबे यांनी  सभासदांशी बँकेने करार करावा, अशी सूचना केली. संतोष दुसुंगे यांनी ठरावावर सकारात्मक मत मांडले. बाळासाहेब कोतकर यांनी पारदर्शक नियोजन करा, तसेच ऐच्छिक नको, सर्वांना सोबत घेवून हे काम व्हावे, असे सुचविले. दत्ता चोथे यांनी ठेवी वर्ग करण्याच नापसंती दर्शविताना सव्वा दोन कोटींचा लाभांश इमारत निधीत वळविण्यावर आक्षेप नोंदविला. रघुनाथ झावरे यांनी ठेवी वर्ग करण्यास विरोध दर्शविला.
बापूसाहेब तांबे यांनी अविनाश निंंभोरे यांचा समाचार घेताना माजी संचालकांचा मान ठेवला नाही, असे ते म्हणतात. पण किमान यांनी तुमचे फोटो टाकले, पण तुमची सत्ता आल्यावर तुम्ही मागच्या संचालकांचा काय मान ठेवला, असा सवाल केला. तर प्रवीण ठुबे यांना उत्तर देताना तुम्ही विकास मंडळाच्या बांधकामासाठी ऐच्छिक निधी घेवून अर्धवट इमारत ठेवली, त्यामुळे आता तसे करणार नाही. आता बांधकाम करायचे असेल तर कम्प्लसरी निधीतून, नाही तर तसेच राहिले तरी चालेल, अशी रोखठोक भुमिका मांडली.
संजय धामणे यांच्यावर बोलताना तुम्हाला कर्जमाफी मागणारे चेअरमन म्हणून ओळखतात, असा टोमणा मारल्यानंतर धामणे व्यासपीठाकडे धावले. त्यावर अंगावर धावून येवू नका, मी हटणार नाही. मला बाऊन्सरची गरज नाही, कारण समोर तगडी माणसे पाहिजेत. आम्हीच बाउन्सर आहेत, असाही धामणेंना टोला लगावला. आवाजी बहुमत व उपस्थिती लक्षात घेता हा विषय आम्ही रेटू शकतो, पण तसे करणार नाही. तुम्ही म्हटले स्थगित तर स्थगित, पण पुढे करायचे काय, हे सांगा.
तुम्ही कमेटी करा. डॉ. कळमकर, संजय धामणे, विकास डावखरे, प्रवीण ठुबे, एकनाथ व्यवहारे, बाळासाहेब कदम, दिनेश खोसे त्यात घ्या.दोन- तीन महिने वेळ घ्या, अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी दिला. सभागृहाचा विरोध लक्षात घेवून सभेचे अध्यक्ष मोटे यांनी या विषयावर एक कमिटी नेमण्यात येईल. त्याचे अध्यक्ष डॉ. कळमकर असतील. ही कमिटी दोन महिन्यांत सभासदांसमवेत चर्चा करून अभ्यास करेल. त्यानंतर पुन्हा विशेष सभा घेवून त्यात यावर निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर करत सभेचा समारोप केला.

अन् बापूंनी पुरावाच दाखविला!

8 जानेवारी 2023 ला विकास मंडळाची सभा झाली. त्यावेळी अध्यक्षांनी सर्व संघटनांचे एक एक प्रतिनिधी द्या, असे सर्वांना फोन केले होते. अद्यापर्यंत एकही नाव आले नाही. 17 जुलै 2023 ला सर्व शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींना पत्र दिले होते. एक एक प्रतिनिधी द्या, समिती नेमून चर्चा करून मग बँकेच्या सभेत ठराव घेवू. कोणीही नाव दिले नाही, असे सांगताना हातात संबंधित पत्र उंचावून पुरावाच दाखविला. त्यामुळे कोणालाही विश्वासात घेतले नाही, हा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बापूंनी माफी मागावी;

समन्वय समिती आक्रमक

तांबे यांनी भाषणात डॉ. कळमकर यांच्यासह अन्य काही नेत्यांवर टोमणेबाजी केली. त्यामुळे संतप्त समन्वय समितीने दुसर्‍या सत्राची सुरुवात बापूंनी माफी मागितल्याशिवाय होऊ देणार नाही,असा पावित्रा घेतला. त्यानंतर कळमकर सभागृहाला शांत करत असताना, तिथे सत्ताधारी महिला व्यासपीठावर आल्या. विद्युलता आढावा यांनी कळमकरांकडून माईक घेतला. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला होता. मात्र कळमकरांनीच आपल्या शैलीत सभागृह शांत केले.

कर्जमर्यादेत वाढ; व्याजदरात कपात; लाभांशही वर्ग!

चेअरमन संदीप मोटे यांनी सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेतले जातील, अशी सभेच्या सुरुवातीलाच ग्वाही दिली. तसेच कर्ज मर्यादेत तीन लाखांची वाढ करून आता 41 लाख कर्ज तसेच कर्जाच्या व्याजदरात 10 पैसे कपात केल्याची घोषणा केली. तसेच सभा सुरू असतानाच सभासदांच्या बँक खाती 9 टक्के प्रमाणे लाभांश वर्ग झाल्याची संदेश मोबाईलवर मिळाल्याने सभासदांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

तांबे-कळमकरांमध्ये जुगलबंदी

कळमकरांनी सांगितलेल्या ‘त्या’ मुंबई दौर्‍यात मीच नव्हतो, तर रोहोकले गुरुजीही होते. आणि तो दौरा विरोधासाठी नव्हता तर वेगळ्या विषयावर होता. मात्र त्यांना वयानुसार आता विसर पडत चालला आहे, असा टोला बापू तांबे यांनी लगावला. तर डॉ. कळमकर यांच्यातील साहित्यीक जागा झाल्याने बापू, वय झालं म्हणता, ठिक आहे, पण अजुनही कोणत्याही क्षेत्रात बरोबरी लावा, मी तुम्हाला हरवून दाखवतो, असा टोमणा मारताच सभागृहात एकच हशा पिकला.
विकास मंडळाच्या इमारतीला आमचा विरोध नाही. यापूर्वीही हा विषय ज्यावेळी चर्चेत आला होता. त्याला आपण विरोध केला होता. यात आजचे सत्ताधारीही होते. त्यामुळे ठेवी वर्ग करण्याबाबतचा निर्णय हा ऐच्छिक असावा. ठेवीतून कपात करू नये, तसे बँकेकडे सभासदांचे अर्ज आले आहेत, ईमेल आले आहेत, त्यावरून तुम्हाला जिल्ह्याची भावना समजायला हवी होती. ज्याला ऐच्छिक द्यायचे, त्याचे घ्या. त्याने एक काय पाच लाख द्यावेत, आमचे काही म्हणणे नाही, मात्र सक्तीने हा निर्णय लादू नये.
– डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते. 
विकास मंडळाचे बांधकाम हे ऐच्छिक निधीतून झाले पाहिजे. त्यामुळे सभासदांची परवानगी न घेता कायम ठेवीतील रुपयालाही हात लावला तर याचे दूरगामी परिणाम संचालक मंडळाला भोगावे लागतील.
     – प्रवीण ठुबे, रोहोकले गटाचे जिल्हाध्यक्ष.
सर्वप्रथम ठेवी संदर्भातील विषय आपण संचालक असताना पुढे आला होता. शिक्षक बँक आणि विकास मंडळ दोन वेगळ्या संस्था आहेत. ठेवी वर्ग करता येणार नाही. एक रुपयाही वर्ग करण्याचा अधिकार संचालक मंडळाला नाही.
– अविनाश निंभोरे, माजी अध्यक्ष.
सत्ताधार्‍यांच्या काटकसरीच्या कारभाराचे कौतुक. हॉस्पिटलसाठी विकास मंडळाला रक्कम दिली तर त्यांची ती सभासदांना परत द्यायची कुवत आहेत का? हे तपासून निर्णय घ्यावा.
            – राजेंद्र शिंदे, सदिच्छा मंडळाचे नेते. 
विकास मंडळाचे बांधकाम व्हावे, ही आमचीही इच्छा आहे. मात्र त्यासाठी शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यात सत्ताधार्‍यांना अपयश आले, त्यामुळेच आज विरोध दिसत आहे. हॉस्पिटल कसे असेल, सभासदांना काय फायदा होईल, आपले पैसे परत कसे मिळतील, याबाबत सभासदांना समजून सांगणे अपेक्षित आहे. त्यानंतरच निर्णय घ्यावा.
– विकास डावखरे, माजी अध्यक्ष, विकास मंडळ
हॉस्पिटल बांधायचे असेल तर ते स्वतःच्या ताकदीवर बांधा. माझ्या सभासदांची मान मी कोणाकडेही गुंतवू देणार नाही. जर मनमानी करून विषय मंजूर केला व ठेवी वळविल्या तर कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात ठेवावे.
 – एकनाथ व्यवहारे, इब्टा नेते. 
चांगले बोलल्यावर टाळ्या आणि वाईट बोलल्यावर हो खाली.., हे योग्य नाही. ठेवी वर्ग करण्याबाबत यापुर्वीही एकदा सभेत चर्चा झालेली आहे. विकास मंडळ आणि बँक वेगवेगळ्या संस्था आहेत. ठेवी वर्ग केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. आम्ही उपनिबंधकांकडे तक्रार अर्ज केलेला आहे. त्यामुळे सभासद भावना लक्षात घेवून हा विषय स्थगित ठेवावा, कोर्टात जाण्याची तयारी आहे.
– संजय धामणे, गुरूकुल मंडळ. 
हेही वाचा

Back to top button