अहमदनगर जिल्ह्यातून दीडशे मुली अडीच वर्षांपासून बेपत्ताच ..! | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यातून दीडशे मुली अडीच वर्षांपासून बेपत्ताच ..!

श्रीकांत राऊत

अहमदनगर : जिल्ह्यातील विविध भागांतून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. नगर शहरासह जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या 152 मुलींचा अडीच वर्षांपासून शोध लागलेला नाही. या मुलींच्या शोधासाठी त्यांचे मायबाप पोलिसांचे उंबरे झिजवत आहेत. कायद्यानुसार बेपत्ता झालेल्या मुलींबाबत अपहरणाचे गुन्हे पोलिस दप्तरी दाखल करण्यात येतात.

नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत तब्बल एक हजार 111 मुली बेपत्ता झाल्या. हा आकडा चिंताजनक असला तरी पोलिसांनी रात्रंदिवस तपास करून 951 मुलींचा शोध घेतला आहे. पोलिसांच्या दफ्तरी असलेल्या आकडेवारीवरून दर 48 तासांना दोन मुलींचे अपहरण होत असून, ही बाब चिंता वाढवणारी आहे. बेपत्ता झालेल्या मुली 16 ते 17 वयोगटातील असल्याने कायद्यातील तरतुदीनुसार अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मात्र, अपहरण झालेल्या 152 मुलींचा अद्याप थांगपत्ता लागलेला नसल्याने त्यांच्या पालकांना चिंता लागलेली आहे. दरम्यान, कायद्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदविला जात असला तरी बेपत्ता झालेल्या काही मुली प्रेमसंबंधातून पळून जात असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. कारण, पळून गेलेल्या अनेक अल्पवयीन मुली वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करूनच परतल्याची उदाहरणे पाहायला मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी तपास लावला भारी!

पोलिस ठाणे स्तरावर अपहरणाच्या गुन्ह्याचा 90 दिवस तपास होतो. या काळात अपहरण झालेला मुलगा वा मुलगी मिळून आली नाही तर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाकडे (एएचटीयू) हा तपास वर्ग होतो. बेपत्ता मुलींच्या शोधासाठी पोलिसांचे एएचटीयू पथक भारी ठरत आहे. गेल्या अडीच वर्षांत अपहरण झालेल्या एक हजार 111 मुलींपैकी 959 मुलींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांच्या हवाली केले आहे.

सात वर्षांनंतर मृत घोषित

बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही, तर कायद्यानुसार न्यायालय सात वर्षांनंतर संबंधिताला मृत घोषित करते. बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीची प्रत न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाकडून मृत घोषित केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते.

बेपत्ता मुलींची आकडेवारी
वर्ष बेपत्ता सापडल्या अजून बेपत्ता
2021 359 36 23
2022 462 402 60
2023 290 221 69
एकूण 1111 959 152

 

Back to top button