वांबोरी चारीला सोमवारी पाणी सुटणार : माजी मंत्री शिवाजी कर्डिले

वांबोरी चारीला सोमवारी पाणी सुटणार : माजी मंत्री शिवाजी कर्डिले
Published on
Updated on

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी, नगर, राहुरी व नेवासा तालुक्यांतील 45 गावांमधील 102 पाझर तलावांसाठी वांबोरी चारीला मुळा धरणातून सोमवारी (दि.21) पाणी सोडण्यात येणार आहे. वांबोरी चारी टप्पा दोन या योजनेची लवकरच निविदा काढून नोव्हेंबर महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे वांबोरी चारी योजनेच्या लाभधारक शेतकर्‍यांची शुक्रवारी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कर्डिले म्हणाले, गेल्या दोन अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी शेतकर्‍यांच्या फळबागा, उभी खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी सध्या पावसाअभावी अस्वस्थ आहे. मुळा धरण 79 टक्के भरले असून, धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकर्‍यांनी केली आहे. त्यामुळे सोमवारी मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे.

तसेच पाथर्डी व नगर तालुक्यांतील बारा गावांसाठी महत्त्वाच्या वांबोरी चारी टप्पा दोन योजनेच्या कामास नोव्हेंबरमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांनी या योजनेच्या कामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. त्यामुळे टप्पा दोनच्या कामाची लवकरच निविदा काढून नोव्हेंबरमध्ये कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईले.

यावेळी कार्यकारी उपअभियंता जे. एम. पाटील, अभियंता व्ही. डी. पाटील, सहायक अभियंता धनश्री शिंदे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, माजी जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, नारायण आव्हाड, धर्माजी आव्हाड, बबनराव आव्हाड, देवीदास आव्हाड, अरुण रायकर, कुशल भापसे, एकनाथ आटकर, संतोष शिंदे, सुरेश चव्हाण, राजेंद्र दगडखैर, रावसाहेब वांढेकर, साहेबराव गवळी, अण्णासाहेब शिंदे, बाबाजी पालवे, किशोर पालवे, महादेव गिते, प्रमोद गाडेकर, रवींद्र भापसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news