

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येरवडा परिसरातील महापालिकेचे राजीव गांधी रुग्णालय 100 खाटांचे (बेड) करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. येत्या सहा महिन्यांत रुग्णालयातील आरोग्यसेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली. राजीव गांधी रुग्णालय चार मजली असून, त्यात सध्या रुग्णसेवेसाठी 45 खाटा उपलब्ध आहेत. प्रसूतिगृहासह बाह्यरुग्ण तपासणीची या ठिकाणी सोय आहे. या रुग्णालयात येणार्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी हे रुग्णालय 100 बेडचे करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने आयुक्तांकडे सादर केला होता. त्यास नुकतीच मान्यता मिळाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
रुग्णालयातील आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. पवार यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली. या वेळी दै 'पुढारी'शी बोलताना त्यांनी ही महिती दिली. ते म्हणाले, 'रुग्णालयात होणार्या गरोदर महिलांच्या प्रसुतींची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच अल्पदरामध्ये एमआरआय, सिटी स्कॅन, एनआयसीयू या सुविधादेखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. शंभर बेडचे हे रुग्णालय लवकरच जनरल हॉस्पिटल म्हणून ओळखले जाईल.'
डॉ. पवार यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोहन बगाडे यांच्यासह वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा करून आरोग्यसेवेच्या विस्तारासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबत माहिती घेतली. शंभर खाटांच्या या रुग्णालयाचा लाभ परिसरातील नागरिकांना होणार असून, लवकरच रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले.
या रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी दहा एमबीबीएस डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ, आर्थोपेडिक, बालरोग तज्ज्ञ, परिचारिका आणि वॉर्ड बॉयचा स्टाफही वाढविण्यात येणार आहे. महापालिकेच्या मेडिकलमधून औषधे मोफत घेण्यासाठी प्रीस्क्रिप्शन (चिट्ठी) मुक्त हॉस्पिटल करण्याचेदेखील नियोजन आहे.
– डॉ. भगवान पवार,
आरोग्यप्रमुख, महापालिका
हेही वाचा