बिबट्या आला… रे आला..! अहमदनगरमध्ये आवई | पुढारी

बिबट्या आला... रे आला..! अहमदनगरमध्ये आवई

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी परिसरातील पंपिंग स्टेशन ते बोल्हेगावदरम्यानच्या रस्त्यावर गुरुवारी (दि.17) रात्री साडेनऊच्या सुमारास नागरिकांना बिबट्या दिसल्याची आवई उठली. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र हा बिबट्या कोणी पाहिला याची पुष्टी झालीच नाही; शिवाय व्हायरल झालेले व्हिडिओही नगरमधील नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. मात्र परिसरात घबराट निर्माण झाल्याने तोफखाना पोलिसांनी गुरुवारी रात्रीच त्या परिसरात गस्त घालत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने आज सकाळी परिसरातून फिरून पाहणी केली असता त्यांना आढळलेले पायांचे ठसे बिबट्यासदृश प्राण्याचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र तो बिबट्याच असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला नाही.

नगर शहराजवळील चांदबीबी महाल परिसरात बिबट्या आढळला होता. गुरुवारी शहरातील सीना नदीकाठी बालिकाश्रम रोड, पंपिंग स्टेशन परिसरात नागरिकांना बिबट्या दिसल्याची बातमी समोर आली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तोफखाना पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी तत्काळ परिसरात गस्त घालून रात्री नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
पंपिंग स्टेशन परिसरात बिबट्या आल्याची बातमी वार्‍यासारखी नगर शहरात पसरली. त्याची सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा झाली.

शुक्रवारी सकाळी प्रभारी सहायक वनसंरक्षक सुरेश राठोड, वनक्षेत्रपाल अशोक शरमाळे, विजय चेमटे, अशोक गाडेकर, संदीप ठोंबरे, वन्यजीवरक्षक मंदार साबळे यांनी परिसरात पाहणी केली. या वेळी त्यांना रस्त्याच्या कडेला बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे चार ते पाच दिवसांपूर्वीचे ठसे आढळून आले. मात्र ते ठसे बिबट्याचेच आहेत, अशी खात्री पटली नसल्याचेच समोर आले. तरी देखील नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सीना पट्ट्यात लांडे थळ येथे काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता, असेही सांगण्यात आले.

अनेकांचा जॉगिंगट्रॅक

पंपिंग स्टेशन रोड ते जुना बोल्हेगाव रोड ते बालिकाश्रम रोड हा अनेकांचा जॉगिंगचा रस्ता आहेे. सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडतात. परंतु, त्या परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळून आल्याने नागरिकांचे फिरणे बंद झाले आहे.

पिंजरा लावण्याची मागणी

काटवन खंडोबा ते जुना बोल्हेगाव रस्ता परिसरात शेतजमीन आहे. शेतात उसाचे पीक आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे. यापूर्वी परिसरात बिबट्यासदृश प्राण्याचे ठसे आढळून आले होते. त्यामुळे बिबट्या असल्यास जीवितहानीची भीती असल्याने वन विभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.
तो व्हिडिओ नगरचा नाही

पंपिंग स्टेशन परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेकांनी बिबट्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. त्यात एक बिबट्या रस्ता ओलांडून शेतात पळत असल्याचा आणि त्याला पाहून लोक ओरडत असल्याचा एक व्हिडिओ असून, दुसर्‍या व्हिडिओत बिबट्या भिंतीवरून जात असल्याचे दिसते. मात्र, यातील एकही व्हिडिओ नगरमधील नसल्याचेच स्पष्ट होते, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि खात्री न करता व्हिडिओ प्रसिद्ध करून अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा

दिव्यांग ज्ञानेश्वरची यशाला गवसणी; मुक्ताई ठरली ज्ञानेश्वराची आधार

सायबर चोरटा पोलिसावर भारी! पोलिसालाच 32 लाखांचा गंडा

लालपरीचं चांगभलं ! पुणे विभागाच्या उत्पन्नात चौपट वाढ, तर प्रवासी पाचपट वाढले

Back to top button