रोजगार निर्मितीत नगर प्रथम : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील;

रोजगार निर्मितीत नगर प्रथम : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील;
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्ह्यात रोजगार निर्मितीवर अधिक प्रमाणात भर देण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबीराच्या माध्यमातून 5 हजार 989 युवकांना करिअर संधीचा, तर तीन रोजगार मेळाव्याद्वारे 1 हजार 130 युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे गौरवोद्गार राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजचा स्वातंत्र्य दिन ऐतिहासिक अशा वातावरणात साजरा होत आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी आपल्या देशाची वाटचाल सुरु असुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची नवीन प्रतिमा तयार होत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मंत्र बलशाली भारताच्या विकासाचे सुत्र बनले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात 'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' अभियान 9 ऑगस्ट, 2023 संपुर्ण देशभरात सुरु झाले आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग नोंदवुन आपल्या मातृभूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्य शासनाने देशात पहिल्यांदा शेतकर्‍यांसाठी केवळ एक रुपयामध्ये पीकविमा राबविण्याचा निर्णय घेतला. गतवर्षामध्ये केवळ 2 लक्ष शेतकर्‍यांनी या योजनेमध्ये भाग घेतला होता. परंतु यावर्षी जिल्ह्यातील 11 लक्ष शेतकर्‍यांनी या पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवुन आपले पीक संरक्षित केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन हरघर नल योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातुन या योजनेसाठी जिल्ह्यात 4 हजार कोटी रुपयांच्या निधीद्वारे पाणी पुरवठ्याची कामे केली जात असल्याचेही सांगितले.

जिल्ह्याच्या विकास करणे हाच आपला ध्यास आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण असा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यास मूर्त स्वरुप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास, नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाबरोबरच विशेष उपक्रम राबवुन सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यावत अशा क्रीडा संकुलाच्या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस उपनिरीक्षक अंबादास सुखदेव हुलगे, पोलिस निरीक्षक दिनेश विठ्ठल आहेर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनुकंपा नियुक्ती धोरणांतर्गत उमेदवारांना नियुक्तीपत्र, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व कृषी विभागातील उत्कृष्ट कर्मचार्‍यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news