शाब्बास पोरी ! विद्यार्थिनीने केला अपहरण करणाऱ्या टोळीचा धाडसी प्रतिकार | पुढारी

शाब्बास पोरी ! विद्यार्थिनीने केला अपहरण करणाऱ्या टोळीचा धाडसी प्रतिकार

शेवगाव/ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा :  फूस लावून इयत्ता सहावीत शिकणार्‍या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न मुलीच्या धाडसी प्रतिकारामुळे अयशस्वी झाला. ही घटना गुरूवारी (दि.10) घडली आहे. या धाडसी मुलीचे कौतुक होत असले तरी ती भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्याच दिवशी प्राथमिक शाळेत शिकणार्‍या चार मुलींचेही अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. तालुक्यातील वडुले खुर्द येथील श्री संत वामनभाऊ विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणार्‍या अश्विनी आजिनाथ गर्जे या 11 वर्षांच्या मुलीस गुरूवारी (दि.10) सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना चायनीज चाऊमीनचे आमिष दाखवून तिचे वाहनातून अपहरण करण्याचा प्रयत्न एक पुरूष व तीन महिलांकडून झाला.

मात्र, सदर मुलीने मोठ्या धाडसाने अपहरणकर्त्यांना प्रतिकार केल्याने हा प्रयत्न अशस्वी झाला. ती प्रतिकार करत असताना पाठीमागून दुचाकी वाहन येत असल्याचे पाहून अपहरण करणारे पसार झाले. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर प्राथमिक शाळेतील चार मुली जात असताना, ग्रामपंचायत कार्यालयासमोर देवाला जाण्याच्या आमिषाने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कार्यालयात दोन व्यक्ती असल्याचे लक्षात आल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर कानिफनाथ वस्तीवर राहणारी अश्विनी गर्जे आपल्या घराकडे जात होती. यावेळी एक पुरूष व तीन महिलांच्या टोळीने त्यांच्याकडील स्विफ्ट डिझायर ( एमएच 16-1822) या वाहनात तिला बळजबरीने बसविण्याचा प्रयत्न केला.

आजूबाजूला कोणीही नाही, हे पाहून यातील एका महिलेने गाडीच्या खाली उतरून अश्विनी हीस आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, तुझ्या वडिलांनी आमच्याजवळ सांगितलं आहे, तू गाडीत बस, असं म्हणून चायनीज चाऊमीन खाऊच्या आमिषाने तिला वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अश्विनीने प्रतिकार केला. त्यामुळे तिच्या तोंडाला रूमाल बांधण्यात आला. तरीही अश्विनीने तोंडाचा रूमाल काढला व महिलेच्या हाताला हिसका देऊन पळ काढला. टोळीतील तीन महिलांनी पाठलाग करून अश्विनीला पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, अश्विनीने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा झाडाला कवळ घातली. यावेळी झालेल्या झटापटीत अश्विनीला किरकोळ खरचटले आहे. त्याचवेळी रस्त्याने पाठीमागून कोणीतरी येत आहे, हे पाहिल्यावर चौघेही वाहनातून आव्हाने रस्त्याने पसार झाले.

छोट्या अश्विनीने दाखविलेल्या या धाडसी प्रतिकारामुळे ती अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बचावली आहे. ही घटना वार्‍यासारखी गावामध्ये समजतात अनेकांनी तिचे कौतुक केले. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक प्रा.किसन चव्हाण यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना घाबरून न जाता सतर्क राहण्याच्या, तसेच अनोळखी व्यक्ती व अनोळखी गाडीमध्ये न बसण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सुरेश आव्हाड, आजिनाथ आव्हाड, विष्णू आव्हाड, गोकुळ नागरे, अमोल आव्हाड यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व युवक उपस्थित होते. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झालेली नाही.

हेही वाचा :

जागतिक हत्ती दिन : देशातील 27 हजार हत्तींचे डीएनए जतन करणार

प्रेमासाठी तब्बल 2 हजार 484 कोटींच्या संपत्तीवर तिने सोडले पाणी

Back to top button