नाशिक, दिंडोरी लोकसभेची जबाबदारी आ. थोरात यांच्याकडे | पुढारी

नाशिक, दिंडोरी लोकसभेची जबाबदारी आ. थोरात यांच्याकडे

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूका पुढील वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेसह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत काँग्रेसने माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर तेथील जबाबदारी सोपवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने मुंबई येथे राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी, याकरिता मतदारसंघनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून लोकसभा क्षेत्रनिहाय नियुक्ती प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी जाहीर केल्या. नाशिक जिल्ह्यातील चार प्रदेश पदाधिकार्‍यांकडे चार लोकसभा मतदारसंघांची तर नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना देण्यात आली आहे.

लोकसभा निरीक्षक व समन्वयक यांची आगामी 7 ते 14 ऑगस्टदरम्यान मतदारसंघाचा विधानसभा निहाय दौरा व बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकार्‍यांना बैठकीत निमंत्रित केले जाणार आहे. नाशिक व दिंडोरी हे दोन्ही मतदारसंघ दोन दशकांपूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला समजले जात होते. हे दोन्ही मतदारसंघ भाजप व शिवसेनेकडे आहेत. काँग्रेसला सतत येथे पराभव पत्करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते, आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

नाशिकच्या पदाधिकार्‍यांवर शिर्डीची जबाबदारी

नाशिक जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांवर अन्य मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्याकडे नंदुरबार लोकसभा, प्रदेश पदाधिकारी शरद आहेर यांच्याकडे ठाणे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे धुळे तर प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस समन्वयकाची जबाबदारी सोपविली आहे.

हेही वाचा

महाअधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ४२ मागण्यांचे ठराव पारित

श्रीरामपूर : अतिवृष्टीच्या नुकसान यादीतून नावे वगळली

पिंपरी : नागरिकांनो कानाचे पडदे सांभाळा..! शहराच्या ध्वनिपातळीने ओलांडली मर्यादा

Back to top button